सीबीएसई बोर्डाची परीक्षा आता दोन टर्ममध्ये होणार
नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस) ने २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष असेसमेंट स्कीमनुसार या सत्रामध्ये दोन वेळा परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. बोर्डाने या संबंधिचा अभ्यासक्रम या महिन्याच्या अखेरीपर्यंत जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सीबीएसईने सांगितले की, अॅकॅडमिक वर्ष २०२१-२२ दोन टर्ममध्ये विभाजित होईल. प्रत्येक टर्ममध्ये ५०-५० टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल. माहितीनुसार सीबीएसई पहिल्या सत्राची परीक्षा ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित करेल. त्यानंतर दुसऱ्या सत्राची परीक्षा ही मार्च एप्रिलमध्ये घेण्यात येईल. शैक्षणिक सत्र २०२२१-२२ च्या अभ्यासक्रमाचे विषय तज्ज्ञांकडून आकलनक्षमता आणि विषयांचे परस्पर संबंध पाहून एका व्यवस्थित दृष्टीकोनाचे पालन करत दोन भागांमध्ये विभाजित करण्यात येईल.