राजकारण

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा; हायकोर्टात याचिका

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोठडीत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जबाबात या दोघांची नावं असल्याचा दावा करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याचा आरोप आणि १०० कोटी वसुली प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केली आहे. सचिन वाझेला एन आय ए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सचिन वाझे याने विशेष एनआयए कोर्टाच्या न्यायमूर्तींना खुल्या कोर्टात एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनात, आपल्याला अजित पवार यांच्यावतीने दर्शन घोडावत यांनी महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. राज्यात बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरू आहे. यातल्या ५० बेकायदेशीर गुटखा व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपल्याला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांनीही महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून आणून देण्याचे आदेश दिले होते, असा दावा वाझेने केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

मुंबई महानगरपालिकेत ५० ब्लॅक लिस्टटेड कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी २ कोटी प्रमाणे महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करून आणून द्यावेत असे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे सैफी बुऱ्हाणी इंप्रूव्हमेंट ट्रस्टची चौकशी सुरू आहे. या ट्रस्टच्या ट्रस्टीची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून चौकशी थांबवण्यासाठी 50 कोटी रुपये माझ्यासाठी मागवेत असे सांगितलं होतं, असं सचिन वाझे याने आपल्या निवेदनात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अशाच पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं होतं. त्याबाबत पुढे हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने सीबीआयला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुढे सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. याच पद्धतीने सचिन वाझेच्या निवेदनाच्या अनुषंगाने अजित पवार , त्यांचे जवळचे मित्र दर्शन घोडावत त्याचप्रमाणे अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असं रत्नाकर डावरे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेत राज्य सरकार, मुंबईचे पोलीस आयुक्त , पोलीस सहआयुक्त ,सीबीआय यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. या याचिकेवर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button