उमेदवार उद्धव ठाकरेंचा; नाव नरेन्द्र, हातावर ‘देवेंद्र’ !
नवी मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर देवेन्द्र हे नाव कोरले आहे. विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. नरेंद्र पाटील यांनी २०१९ मधील लोकसभेची निवडणूक सातारा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष उलटलं, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नसल्याचं सांगत मार्च २०२१ मध्ये नरेंद्र पाटलांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.