मतदानादिवशी बहिणीसाठी प्रचार; सोनू सुदवर गुन्हा दाखल
मोगा : अभिनेता सोनू सूद विरोधात पंजाबमध्ये मोगा मतदार संघात निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यावेळी सोनू सूद त्याची कार घेऊन मतदान केंद्रावर पोहोचला होता. निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून सोनू सूदची कार जप्त करुन घरी पाठवण्यात आले होते.
अभिनेता सोनू सूद बहिण मालविका सूद हिच्या मोगा मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये १८ फेब्रुवारीला निवडणूक प्रचार संपल्यानंतर बाहेरील लोकांना विधानसभा क्षेत्र सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही मतदानादिवशी सोनू सूदने मतदान केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
मोगा पोलिसांनी सोनू सूद विरोधात निवडणूक आयोगासोबत बोलून आयपीसी कलम १८८अंतर्गत एफआयआर नोंदवली आली. पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आचार संहिते संदर्भात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधक अकाली दलाच्या काही लोकांकडून विविध मतदान केंद्रावर धमकीचे फोन आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही मतदान केंद्रांवर पैसे वाटत जात आहेत, असे देखील कळाले. त्यामुळे निष्पक्ष निवडणूका होत आहेत की नाही हे पाहणे आमचे कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही तिथे गेले होतो. पण त्यांच्या कारवाईनंतर आम्ही घरी आलो आहोत. निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात हीच आम्ची इच्छा आहे असे स्पष्टीकरण सोनू सूदने दिले होते.