राजकारण

देगलूरसह देशातील ३० विधानसभांसह, ३ लोकसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

३० ऑक्टोबरला मतदान, २ नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील ३० विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. कोरोनाचं संकट, पूरस्थिती, सण-उत्सव आणि काही राज्यांतील थंडीचा कडाका आदी परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

देगलूरमध्ये पोटनिवडणूक

नांदेडच्या देगलूरमध्येही विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं ९ एप्रिल रोजी निधन झालं होतं. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनामुळे देगलूर विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी निवडणूक होत आहे. या रिक्त जागेवर काँग्रेसकडून अंतापूरकर यांच्या कुटुंबातील सदस्यालाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दादर आणि नगर हवेली, दमन दीव, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशातील खंडवामध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्याशिवाय 13 राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यात मध्यप्रदेश, आसाम, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

१ ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन्स काढलं जाईल
८ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्रं भरण्याची शेवटची तारीख
११ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार
१३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार
३० ऑक्टोबर रोजी मतदान
२ नोव्हेंबर रोजी अर्ज मतमोजणी आणि निकाल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button