चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा; अजित पवारांवरील भाजपच्या आरोपाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र चोरल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांचे हे कृत्य कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात अशी टीका त्यांनी केली होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपा नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतंच. उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात. तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे”.