संकटं माणसाची परीक्षा पाहत असतात. अशा संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणं हा मानवी धर्म असतो; परंतु संकटात अडल्या, नडलेल्यांची अडवणूक करून, लूट करण्याची काहींची वृत्ती असते. या प्रकाराला मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. रुग्णालयं, औषध दुकानं, रुग्णवाहिका आदी धर्मादाय पद्धतीने चालविता येत नाही, हे खरं असलं, तरी त्यातून नफेखोरी वृत्ती जोपासावी, असं नाही. गुंतवणूक, त्यावरील व्याज, कुटुंब चालवण्यासाठी योग्य नफा पैसे मिळवणं वेगळं आणि इतरांच्या अडचणीचं भांडवल करून अवाजवी नफा कमविणं वेगळं. त्यातही आरोग्याशी निगडीत व्यक्तींना देव मानण्याची आपली संस्कृती आहे.
रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांना देव मानतात. ही प्रतिमा टिकवण्याची जबाबदारी संबंधित घटकांची आहे. देव व्हायचं, की ’देवमाणूस’ हे ज्यानं त्यानं ठरवायचे असतं. या व्यवस्थेतील सर्वंच जण ’देवमाणूस’ व्हायला निघालेले नाहीत; परंतु त्यांचं प्रमाण वाढतं आहे, ही चिंतेची बाब आहे. सरकारनं घालून दिलेले नियम आपल्या फायद्यासाठी पायदळी तुडविण्याचं प्रमाण वाढलं आहे. अजीर्ण होईल अशी नफेखोरी वाढली आहे. देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेनं कहर केला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगासमोर संकट उभं केलं आहे. या संकटाच्या वेळी प्रत्येक जण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढं येत आहे; परंतु दुसर्या बाजूला काही हॉस्पिटल चालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी गोरगरीब रुग्णांना लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रचंड प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील वोकहार्ट नावाच्या प्रसिद्ध रुग्णालयानं रुग्णाच्या मेडिक्लेम पॉलिसीहूनही अधिक बिल वाढवत नेलं. जादा आलेलं बिल भरण्याची ऐपत नाही, म्हणून रुग्णाला चक्क तीन दिवस डांबून ठेवलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका तसंच अन्य यंत्रणा जाग्या झाल्या. त्यांनी हालचाल केल्यानं नंतर संबंधित रुग्णाला सोडून देण्यात आलं.
असाच प्रकार मध्य प्रदेशात घडला. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात इंदूरजवळ असाच प्रकार घडला. तिथं तर पैसे थकले, म्हणून रुग्णाला खाटेला बांधून ठेवलं होतं. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात असंच एक प्रकरण समोर आलं. एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांना देण्यास नकार दिला. पहिलं हॉस्पिटलचं संपूर्ण बिल भरा, त्यानंतरच मृतदेह ताब्यात देऊ अशी भूमिका हॉस्पिटलनं घेतली. हे प्रकरण वापीच्या 21 सेंचुरी या प्रसिद्ध हॉस्पिटलचं आहे. या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला कोविड असल्याच्या संशयावरून उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल प्रशासनानं मृतदेह नातेवाइकांना देण्यास नकार दिला. पैसे नसल्यानं हॉस्पिटलनं नातेवाइकांची कार गहाण ठेवली. त्यानंतर रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. या प्रकारानंतर नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात हॉस्पिटलविरोधात तक्रार केली.
इंजेक्शनचा काळाबाजार, औषधांचा काळाबाजार एकीकडं सुरू आहे. रुग्णालयात बेडस् नसल्यानं रुग्णांची गैरसोय होतं आहे. त्याचा अचूक फायदा मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणार्या यंत्रणेतील एका साखळीनं उचलला आहे. जादा पैसे द्यायची तयारी असलेल्यांना खाटा उपलब्ध करून देऊन, त्यातून नफा कमविणार्या टोळ्या काही ठिकाणी तयार झाल्या आहेत. टाळेबंदीनं अगोदरच नोकर्या गेल्या. उत्पन्न घटलं. जगण्याची लढाई अतिशय गंभीर टप्प्यावर असताना रुग्णलूट म्हणजे दानवी प्रवृत्ती वाढली आहे. त्यात आता रुग्णवाहिका चालक, मालक सहभागी व्हायला लागले आहेत. काही जणांनी कोरोनाच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे धंदे सुरु केले आहेत. अनेक ठिकाणी लाखो रुपयांपर्यत रुग्णालयांची बिलं दिली जात आहेत. कोरोना म्हणजे कमाई अशाप्रकारे खासगी रुग्णालयं, रुग्णवाहिका चालक, औषध विक्रेते लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत. कोलकाता इथं एका रुग्णवाहिकेच्या चालकाचा मनमानी समोर आली. कोरोना संक्रमित मुलांना सहा किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकानं नऊ हजार दोनशे रुपये भाडं मागितलं. ही घटना कोलकातामधील हायप्रोफाईल परिसर पार्क सर्कस येथील आहे. हे भाडं देण्यास नकार दिल्यानं कोरोना संक्रमित मुलांना आणि त्यांच्या आईला रुग्णवाहिकेतून खाली उतरवलं. यानंतर या प्रकरणात डॉक्टरांनी लक्ष घातल्यानंतर रुग्णवाहिका चालकानं दोन हजार रुपये भाड्यात घेऊन जाण्यास तयार झाला. एक मुलगा नऊ वर्षाचा, तर दुसऱा मुलगा अवघ्या नऊ महिन्याचा आहे. या दोन्ही मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर दोघांना आयसीएचमधून कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितलं. रुग्णवाहिका बोलवण्यात आली; पण ती येण्यास उशीर झाला. त्यानंतर मुलांना सहा किलोमीटर अंतरावर असणार्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. रुग्णवाहिका चालकानं नऊ हजार दोनशे रुपये भाडं मागितलं. इतकं भाडं देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर चालकानं छोट्या मुलाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकला. त्यात मुलाचा मृत्यू झाला असता, तर त्याला कोण जबाबदार होतं? कोलकात्यासारखा प्रकार नगरमध्ये घडला. नगरमधील तारकपूरमधील रुग्णालयातून अमरधामला मृतदेह नेण्यासाठी अॅयम्ब्युलन्स चालकानं तब्बल आठ हजार रुपये मागितलं. रुग्णाचं निधन झाल्यानं आधीच दुःखात असलेल्या व त्याच्या बिलाची तजवीज करताना नाकीनऊ आलेल्या नातेवाइकांना अॅतम्ब्युलन्स चालकानं मागितलेले पैसे ऐकून धक्का बसला; पण वेळ पाहून त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा त्याची मिनतवारी केली व त्यानंतर साडेचार हजार रुपयात त्यानं मृतदेह अमरधामला पोहोचवला. दीड-दोन किलोमीटरसाठी साडेआठ हजार रुपये हे कोणत्या निकषांत बसतं? खरतंर हॉस्पिटलकडं रुग्णवाहिका असतात. हॉस्पिटलनं मृतदेह पोचवायची जबाबदारी घ्यायला हवी होती. रुग्णवाहिकांसाठी नगर शहरांतल्या शहरात रुग्ण न्यायचा असेल, तर सातशे रुपये दर ठरविलेला असताना दहा-बारापट रक्कम कशी आकारू शकतात. घरातील कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानं आधीच दु:खाचा मोठा डोंगर सर्वसामान्य कुटुंबांवर कोसळलेला असताना अशा संतापजनक घटना घडत आहेत.