नवी मुंबईतही बोगस लसीकरण; तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा
नवी मुंबई : कोरोनाचे संकट देशावर अद्याप कायम आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिग पाळणे,हात स्वच्छ धूणे,मास्क लावणे यासोबतच लसीकरण करणे देखील गरजेचे आहे. सध्या देशामध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद लसीकरणाला मिळत असल्याचे दिसतेय. परंतू याचदरम्यान बोगस लसीकरण करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरात बोगस लसीकरणाची बातमी समोर आल्यानंतर आता नवी मुंबईत बोगस लसीकरण करण्यात येत अल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणाबाबत पोलिस तपास करत असून गुन्हा दाखल केला असल्याचे कळतेय. दरम्यान, हे लसीकरण ज्यांनी कांदिवलीत केले, त्याच्यावर संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे.
नवी मुंबईमधील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील ३५० कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. त्रिपाठी याने याआधी मुंबईतील कांदिवलीमध्ये अनेक लोकांना फसवून त्यांचे बोगस लसीकरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कांदिवली येथे गुन्हा दाखल केला होता. आता शिरवणे एमआयडीसीतील प्रकारानंतर तुर्भे पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.