मुंबई : सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांचा शिवसेनेशी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याशी कलगीतुरा सुरू आहे. अशातच आता नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासाठी त्यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या सेक्शन ३५१,३५२, ३५२ अ, ३५४ अ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास अनधिकृत कामांवर हातोडा चालवण्यात येईल असे पालिकेच्या नोटीशीत सांगण्यात आले आहेत. तसेच बांधकामाच्या वेळी दिलेल्या नकाश्या व्यतिरिक्त करण्यात आलेले ८ बदल देखील नमुद करण्यात आले आहेत.
याआधी मंत्री नारायण राणे यांनी मी काय अनधिकृत बांधकाम केले आहे असे म्हटले होते आणि त्यानंतर आता जुहूमधील अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासंबंधी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता एकीकडे दिशा सालीयन प्रकरणातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागलेल्या राणे पिता-पुत्रांचा एक पाय खोलात अडकलेला असताना आता दुसरा पायही जुहूच्या बंगल्यात अडकणार आहे.
राणे यांचा जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या अनेक तक्रारी याआधी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेकडून दोन वेळा या बंगल्याची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी पालिकेच्या पथकाला सदर बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम आढळून आले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बंगल्यातील अनधिकृत बांधकामाचे फोटोही काढले होते. त्यानुसार पालिकेने राणे यांना कलम ३५१(१)ची नोटीस पाठवून सदर बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करावे अथवा अनधिकृत बांधकाम स्वतः पाडून टाकावे. अन्यथा सात दिवसांनी पालिका पथक बंगल्यात घुसून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवून ते पाडणार आहे. तसेच, या पाडकामासाठी पालिकेला जो काही खर्च येईल तो राणे यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.