कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याच्या समस्या
मुंबई : कोविशील्ड लस घेतल्यानंतर काहीजणांना रक्त गोठण्याची समस्या दिसून येत आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्वाची सूचना आणि माहिती दिलीय. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना लस घेणाऱ्या लोकांना अन्य लोकांना थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सबाबत जागरुक करा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केलीय. कोरोना लस घेतलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या यादीतील लक्षणं ही रक्त गोठण्याच्या (blood clotting) समस्येबाबत आहेत.
कोरोनाची लस घेतल्यानंतर ब्लीडिंग (रक्त वाहणे) आणि क्लोटिंग (रक्ताच्या गाठी) होणं ही समस्या भारतात कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढल्यास थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या काही भागात कोविशील्ड लस घेतल्यानंतर थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. अशाच काही घटना ११ मार्च २०२१ रोजी पाहायला मिळाल्या होत्या. अशा समस्या समोर आल्यानंतर सरकारकडून त्याबाबत पडताळणी करण्यात आली आणि त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे हा विस्तृत अहवाल सादर करण्यात आलाय. क्लोटिंग आणि ब्लीडिंगबाबत समितीने आपला अहवाल सादर केलाय. या अहवालात 498 गंभीर प्रकरणांवर अभ्यास करण्यात आलाय. त्यातील २६ केस थ्रोम्बोएंबोलिकशी संबंधित असल्याचं समोर आलाय. यामध्ये तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होता. तसंच या गाठी फुटून अन्य धमन्यांना नुकसान होण्याची शक्यता असते. असे प्रकार कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. असं असलं तरी त्याचा दर प्रति १० लाख डोसमध्ये ०.६१ टक्के आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन लसीबाबतही अशी लक्षणं आढळून आली आहेत. पण ती गंभीर नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.
.@MoHFW_INDIA is issuing advisories to healthcare workers & vaccine beneficiaries to encourage people to be aware of suspected thromboembolic (blood clotting) symptoms occurring within 20 days after receiving any #COVID19 vaccine (particularly Covishield)https://t.co/HxPI0d8hWt pic.twitter.com/mmRpKw0oua
— PIB India (@PIB_India) May 17, 2021
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार खास करुन कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कुठली समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स हे लस घेतल्यानंतर साधारणपणे २० दिवसांच्या आत दिसून येतात. या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केल्यास त्यांना याबाबत माहिती मिळेल आणि ते काळजी घेतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.
थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सच्या तक्रारी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये जास्त प्रमाणात समोर आल्या आहेत. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये पाहिला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते युरोपीय देशांच्या तुलनेत दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये या समस्या कमी आहेत. भारतात या समस्या आढळून आल्या आहेत, मात्र लक्षणं गंभीर नाहीत. मात्र, नागरिकांनासाठी राज्य सरकारने एक जनजागृती अभियान राबवलं आहे.
थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्समध्ये आढळणारी लक्षणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– छातीत दुखणे
– हात दुखणे
– इंजेक्शन केलेल्या जागेच्या बाजूला त्वचेवर लाल डाग उठणे
– उलटी होणं आणि पोटात दुखणे किंवा फक्त पोटात दुखणे
– शरिरावर रेषा उमटणे
– उलटी आणि डोकं दुखणं किंवा फक्त डोके दुखी
– अशक्तपणा, हात किंवा शरीराच्या अन्य भागाला पॅरालिसिस (चेहऱ्यावरही)
– विनाकारण उलटी होणे
– नजरेसमोर अंधारी येणं, डोळे दुखणे किंवा वस्तू दोन-दोन दिसणे
– मानसिक स्थितीत बदल, कन्फ्युजन किंवा डिप्रेशन
– अशी शारीरिक स्थिती जी चिंता वाढवेल