आरोग्य

बीकेसीतील कोविड आरोग्य केंद्रात अनुभवी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्रात पुरेसे आणि पात्रताधारक डॉक्टर उपस्थित नाहीत तसेच या आरोग्य केंद्रात कथित गैरकारभार होत असल्याचे निराधार असे आरोप समाज माध्यमातून करण्यात आले आहेत. हे आरोप पूर्णपणे चुकीचे असून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ते फेटाळून लावले आहेत.

या आरोपांचा इन्कार करत असतानाच महापालिकेने त्यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी समर्पित कोविड आरोग्य केंद्रात सद्यस्थितित २ हजार ३२८ रुग्ण बेड्स आहेत. या केंद्रात दाखल होत असलेल्या कोविडबाधित रुग्णांवर त्वरीत उपचार सुरु करण्यासाठी वैद्यकीय सल्लागार, डॉक्टर, परिचारीका, कक्ष सहायक यांची नेमणूक ही आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव ह्यांच्या निकषानुसार तसेच मुलाखत घेऊन करण्यात आली आहे. या कोविड आरोग्य केंद्रांमध्ये योग्य पात्रताधारक आणि पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध आहे.

बीकेसी कोविड आरोग्य केंद्रात अनुभवी वैद्यकीय अधिकारी आहेत. ह्यात सर्वाधिक अनुभवी असणाऱ्या डॉक्टरचा अनुभव कालावधी हा १२ वर्षांपेक्षा अधिकचा आहे. सद्यस्थितीत बीकेसी कोविड रुग्णालयात ३० वैद्यकीय सल्लागार (एमडी व तत्सम), १८ एमबीबीएस डॉक्टर, १५ बीएएमएस डॉक्टर, ९३ बीएचएमएस डॉक्टर नेमलेले आहेत. तसेच फक्त प्रशासकीय कामकाज करण्यासाठी १४ बीडीएस डॉक्टर नेमलेले आहेत. यासोबत एकूण ३०८ परिचारिका, ३९९ कक्ष सहायक (वॉर्डबॉय/गर्ल) नेमलेले आहेत.

अतिदक्षता विभागामध्ये, कार्डियाक हेल्थ केअर ह्या संस्थेची बाह्य सेवा तत्त्वावर आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करूनच नेमणूक करण्यात आलेली आहे. अतिदक्षता उपचारांचा विचार करता सदर कंत्राटदाराकडून ह्या कोविड केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर्स पुढील तपशीलाप्रमाणे उपलब्ध आहेत. यामध्ये २१ सल्लागार (एमडी व तत्सम), ५४ निवासी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस/बीएचएमएस), ९५ परिचारिका, १८ तंत्रज्ञ (आयसीयू टेक्निशियन) आणि ७० रुग्ण काळजी सहाय्यक (पीसीए) नेमलेले आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुल कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्रशासकीय कार्यवाही योग्यरीत्या केली जात असून कोणतीही अनागोंदी अथवा गैरकारभार केला जात नाही. वास्तविक बीकेसी कोविड आरोग्य केंद्राने कोविड उपचारांसह लसीकरणात देखील महत्त्वाची कामगिरी करून लौकिक कमावला आहे. त्यामुळे प्रस्तुत आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, हे स्पष्ट होते.

एकूणच, वांद्रे कुर्ला संकुल कोविड आरोग्य केंद्रामध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक, अनुभवी असे पुरेसे मनुष्यबळ सतत रुग्णसेवा देत आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर करण्यात येत असलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध होते. बीकेसी कोविड केंद्रामध्येमध्ये असलेली सक्षम आरोग्य व्यवस्था व रुग्ण सेवेमुळे आजवर या केंद्रातून २१ हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होवून घरी परतले आहेत.

बृहन्मुंबई महानगराला कोविड संसर्गापासून सुरक्षित राखण्यासाठी तसेच मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अथक राबते आहे. मुंबई महानगराला कोविड मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या ह्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी आणि जनमानसामध्ये गैरसमज निर्माण होतील, असे आरोप करू नयेत, अशी महानगरपालिका प्रशासनाने विनंती केली आहे.

Related Articles

One Comment

  1. स्वत:ची अब्रू झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. येथील अनुभव नसलेल्या आणि शिकाऊ डॉक्टरांकडून चुकीचे उपचार केले जातात. कोरोना पॉजिटिव अहवाल नसतानाही कोरोनाचे उपचार केले जातात, कोरोना पॉजिटिव अहवाल नाहीतर त्यांना रुग्णांची टेस्ट करावी याचे भान नसते, ३ दिवसात ना त्यांनी आरटी पीसीआर टेस्ट केली ना त्यांनी एचआर सीटी स्कॅन केले. मग या BAMS आणि युनानी डॉक्टरांनी कोणत्या टेस्ट केल्या आणि काय उपचार केले. येथे रूग्ण अदलाबदली चे गंभीर प्रकार घडले आहे. बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आणि ठेकेदार चुका दडवून ठेवत आहेत. ते सपशेल खोटे बोलत असून महापालिका अधिकारी व मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. हे लवकरच उघडकीस येईलच….

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button