बनावट रेमडेसिवीरचा काळाबाजार; विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक

जबलपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी अनेक राज्यं केंद्राकडे मदत मागत आहेत. यादरम्यान अनेक राज्यांमध्ये रुग्णांना लुटत औषधांचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातही सुरु असलेलं बनावट रेमडेसिवीरचा काळाबाजार पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याचाही समावेश आहे.
विश्व हिंदू परिषदेचे नर्मदा विभागाचे प्रमुख सरबजीत सिंह मोखा यांना पोलिसांनी अटक केली आहे. सरबजीत हे जबलपूरच्या सिटी रुग्णालयाचेही प्रमुख आहेत. इंदूर येथून ५०० रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवत रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सरबजीत यांचे मॅनेजर देवेंद्र चौरसीया, सपन जैन यांचा समावेश आहे. औषध कंपन्यांसोबत डिलरशीपची जबाबदारी यांच्यावर होती.
गुजरात पोलिसांनी बनावट रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ७ मे रोजी सपन जैन यांना जबलपूर येथून अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने सबरजीत यांना पदावरुन काढून टाकलं असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी असं म्हटलं आहे.




