आरोग्य

कामगारांसाठी कोरोना लसीकरण महोत्सवाचे आयोजन व्हावे

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांची मागणी

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार, टाळेबंदी आणि ठप्प पडत चाललेले उद्योग यांमुळे परप्रांतिय कामगार पुन्हा एकदा गावी परतू लागले आहेत, तर शहरांत राहणाऱ्या कामगारांना हाताला काम नसल्याने आपल्या गावी परतण्याची ओढ लागली आहे. या एकंदरच अस्वस्थ परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस प्रणीत इंटक संघटना, इंटक प्रणित कामगार संघटनांनी पुढाकार घेवून ज्या ठिकाणी कामगारांची संख्या अधिक आहे. त्याठिकाणी कामगारांसाठी लसीकरण मोहिमेचे नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असताना राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक प्रकारचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच केंद्र सरकारकडून कोरोना लस वाटपात महाराष्ट्रावर अन्यायच होतो आहे. राज्यातील सर्वच शहरांमधील कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कामगार, कष्टकरी वर्ग कोरोना लसीपासून वंचित राहतो आहे. लसीकरणासाठी हातावरचे पोट असणाऱ्या मजूर तसेच कामगारांना संपूर्ण दिवसाचा वेळ द्यावा लागतो, नोंदणी झालेली असूनही कामगारांना ठरलेल्या वेळेत लसीकरण होत नाही त्यामुळे कामगार, मजूरांचे रोजगार बूडित होत आहेत. कामगारांना लस मिळवण्यात अत्यंत अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातील श्रमजीवींची संख्या आणि त्यांची सध्याची परिस्थिती पाहता अशा बिकट स्थितीत कामगारांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर त्यासाठी महाराष्ट्र इंटकचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व प्रकारचे नियोजन करतील अशी ग्वाहीही छाजेड यांनी दिली आहे.प् प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अशा लसीकरण मोहिमेत अधिकाधिक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच लस मिळेल यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही छाजेड यांनी मांडल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button