चेंबूरमधील २ बेशिस्त कोरोना रुग्णांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या एम पश्चिम विभाग म्हणजे चेंबूर परिसरात दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला. कारण हे दोन्ही इसम कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आलं होतं. असं असताना हे दोघेही इतरत्र भटकताना आढळून आले. शिवाय या दोन्ही इसमांनी हातावर होम क्वारन्टाइनचा शिक्का मारून घेण्यासही मनाई केली होती. म्हणून मुंबई महापालिकेने अशा लोकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि चेंबूर विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने वॉर्डातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात एफआयआर दाखल केला.
गेले काही दिवस महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्ण संख्या हजारोंच्या संख्येने वाढत आहे. दररोज नवनवीन रुग्ण समोर येत असताना महापालिका मात्र सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच कायद्याचा धाक निर्माण व्हावा म्हणून दंडात्मक कारवाई करत आहे. परंतु तरीही काहीजण महापालिकेच्या नियमांकडे डोळेझाक करताना दिसतात. अशाच बेफिकिरी मुंबईकरांना अद्दल घडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे.
त्यापैकी एका इसमाचे नाव अजय तलरेजा असून त्यांचं वय 52 वर्षे आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगी आणि स्वतःला ते असे तिघेही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. होम क्वारन्टाइन असलेल्या लोकांना महापालिकेच्या वतीने दिवसात तीन ते चार वेळा फोन केला जातो आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. असे व्यक्ती घरी आहेत किंवा नाही याचीही चाचपणी केली जाते. महापालिकेच्या वतीने करणात येणाऱ्या या फोनला घरातील व्यक्तींनी योग्य प्रतिसाद दिला नाही. शिवाय महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी उर्मट वर्तन केले. दुसऱ्या दिवशी कल्पेश गोसर नावाच्या एम पश्चिम विभागातच राहणाऱ्या व्यक्तीवर महापालिकेने चेंबूर येथील वसंत पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही व्यक्ती सुद्धा गृहविलगीकरणात राहण्याचे सांगण्यात येऊनही इतरत्र भटकताना आढळून आली आहे.