पुरेसा साठा नसल्याने देशात लसीकरणाची गती मंदावली !

नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सरकारने हाती घेउन एक महिना झाला आहे. मात्र, दररोज १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य सरकारला अद्याप गाठता आलेले नाही. सरकारने एका दिवसात ८६ लाख डोस देण्याचा उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने दैनंदिन आकडा घटत आला आहे.
केंद्र सरकारने २१ जूनला लसीकरणाची सुत्रे हाती घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ८६ लाख डोस देण्यात आले होते. सरकारने दररोज १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, ते अद्याप सरकारला गाठता आलेले नाही. सद्यस्थितीत लसीकरणाची गती दररोज ४० ते ५० लाख डोस एवढी आहे. तर शनिवार आणि रविवारी हे प्रमाण १२ ते १४ लाखांपर्यंत घटल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनंतर पहिल्या आठवड्यात दररोज सरासरी ५८ लाख डोस देण्यात आले. त्यानंतरच्या आठवड्यात हे प्रमाण सरासरी ४० लाख डोसपर्यंत घटले. तर जुलैमध्येही हे प्रमाण दररोज सरासरी ३५ लाख डोसपर्यंत राहिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गतीत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अपेक्षित लक्ष्य गाठता आलेले नाही. सरकारने ६६ कोटी डोसची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. मात्र, हा साठा सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. २४ दिवसांमध्ये ३० ते ४० कोटींचा टप्पआतापर्यंत देशात ४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. १० कोटी डोसचा टप्पा ८५ दिवसांमध्ये गाठला होता. तर ३० ते ४० कोटी डोसचा टप्पा केवळ २४ दिवसांमध्येच गाठला आहे.




