राजकारण

कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भाजपचे गंभीर आरोप

मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामधील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवासांपासून टोकाला गेले आहेत. दरम्यान, आज भाजपाने राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली असून, या आत्महत्येवरून भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणी गडाख यांनी राजीनामा द्यावा, तसेच त्यांनी राजीनामा न दिल्यास सरकारने त्यांना तत्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत. उपाध्ये म्हणाले की, मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे कर्मचारी असलेल्या एका तरुणाने मंत्री गडाख यांच नाव घेत आत्महत्या केली आहे. प्रतीक बाळासाहेब काळे असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये त्याने आपण मंत्र्यांकडे पीए असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच मी तुमच्याकडे सहा वर्षे काम केले, माझी बदनामी का करता असा प्रश्नही विचारला होता. या प्रकरणात त्या तरुणाने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये साधारण दहा जणांची नावे त्याने घेतली आहेत. मात्र पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा जणांची नावं घेतल्यानंतरही केवळी सात जणांवरच गुन्हा दाखल झाला आहे, पण तीन नावांबद्दल पोलिसांनी अळी मिळी गुप चिळी साधली आहे, असा दावा उपाध्येंनी केला आहे.

ते पुढे म्हणतात की, अशा प्रकारे राज्य सरकारमध्ये जलसंधारणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांचं नाव घेऊन कुणी आत्महत्या करत असेल आणि त्याची चौकशी होणार नसेल तर ती शोकांतिका आहे. महाराष्ट्रामध्ये आता लोक मंत्र्यांचं नाव घेऊन आत्महत्या करायला लागले आहेत. याआधी एका मंत्र्याशी संबंधित तरुणीने आत्महत्या केली होती. आता एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली आहे. ३० तारखेला ही घटना घडली. या घटनेनंतर नगर जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे बोलले जात आहे, असे ते पुढे म्हणाले.

त्यामुळे सत्तारुढ पक्षाचे लोक दबाव आणत असल्याने प्रतीक बाळासाहेब पाटील यांना न्याय मिळणार का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. सत्तारुढ पक्ष आहे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते राज्यात काहीही करू शकतात, अशा प्रकारची भूमिका सत्तारुढ पक्षाची आहे का? त्यामुळे प्रतीक काळे याला न्याय द्याचया असेल, तर शंकरराव गडाख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तसेच ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्यांना बाजूला केले पाहिजे. ते मंत्रिपदावर असताना पोलीस कारवाई करायला धजत नाहीत, असे चित्र आहे, जोवर ते मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. असे ते म्हणाले. तसेच जर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर भाजपा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करेल. प्रतीक काळेला आत्महत्या करण्याची वेळ का आली? यामागे कोण आहे हे सगळं समोर आलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.असेही उपाध्ये यांनी सांगितले.

प्रतिक काळे माझा स्वीय सहाय्यक नव्हता : शंकरराव गडाख

प्रतिक काळेची आत्महत्या ही एक दुर्दैवी घटना आहे. विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करतायत. प्रतिक हा माझे बंधू प्रशांत गडाख यांच्या संस्थेतील कॉम्पुटर ऑपरेटर आहे. तो माझा स्वीय सहाय्यक नव्हता. विरोधकांनी एक तरी पुरावा ‌द्यावा ज्यात मी दोषी आहे हे समोर येईल, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली. तसेच मी दोषी असेल तर मला हवी ती शिक्षा द्या. प्रतिकवर माझ्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे म्हणत गडाख यांनी आरोपांचे खंडण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button