राजकारण

मुंबई महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपची आज बैठक

मुंबई: पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

भाजपची ही बैठक आज दुपारनंतर होणार असल्याचं सांगण्यात येतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत का? निवडणुका पुढे ढकलल्या आणि नाही ढकलल्या तर काय प्लान असेल यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

दरम्यान, या बैठकीत भाजपच्या सर्व विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, त्या मतदारसंघांसाठी या बैठकीत खास रणनीती तयार करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या बैठकीत मुंबईतील गुजराती समाज भाजपकडेच कसा राहील यावर रणनीती ठरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधल्या काळात शिवसेनेने गुजराती समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मेळाव्यांचं आयोजन केलं होतं. तसेच काही गुजराती नेत्यांना पदही दिली होती. त्यामुळे गुजराती समाज शिवसेनेकडून जाण्यापासून कसा रोखता येईल, त्या दृष्टीनेही या बैठकीत खल होणार असल्याचं सांगण्यात येतं.

मनसेसोबत युती होणार?

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. मात्र, काँग्रेसचे काही नेते अजूनही आघाडी करण्याची भाषा करत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीबाबतची काँग्रेसची ठोस भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपची रणनीती काय असेल? मनसेबरोबर युती करता येऊ शकते का? मनसेचा प्रांतवाद बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एकत्रित येता येईल का? या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button