
पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी धर्माधर्मामध्ये भांडण लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश समाजाला दिला. आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर त्याबाबत बोलतो. पण हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार? कोण हा विचार पुढे नेणार?, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हा मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत सावित्रीबाई फुले यांच्या १२ फुटी उंचीच्या पुतळ्याचं आज लोकार्पण पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळजी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित. हा पुतळा संजय परदेशी यांनी बनवला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आमनेसामने आले. दोघेही दृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फुले दाम्पत्यांनी त्याकाळात दुष्काळात अन्नछत्रं काढली. आपण काय करतो? आपण म्हणजे सर्वांबद्दल बोलतोय. एखाद्या पक्षाबद्दल बोलत नाही. आजचे युग हे जाहिरातबाजीचे आहे. आपण काही केलं तर बॅनरबाजी करतो. जाहिरातबाजी करतो. हे करावं लागतं. नाही तर मग हो कोणी केलयं कळलं नाही तर मतं कसे मिळणार? पण तो काळ आठवला तर महात्मा फुलेंना आमदार व्हायचं होती की नगरसेवक व्हायचं होतं? सावित्रीबाईंना मंत्री व्हायचं होतं की पंतप्रधान व्हायचं होतं? काही व्हायचं नव्हतं त्यांना. केवळ माझा देश आणि समाज निरोगी असावा हाच त्यांचा हेतू, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.
कोणतंही कार्य करताना अनेकदा विरोध होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो. संघर्ष चुकलेला नाही. पण १८४८ साली त्यांनी पहिली शाळा सुरू केली. नतंर स्वातंत्र्ंय संग्राम सुरू झाला. नंतर देशही स्वातंत्र्य झाला. देश बुरसटलेल्या परंपरेत अकडला तर देश स्वातंत्र्य होऊन काही फायदा होणार नाही, हा विचार त्यांनी केला. त्यामुळेच त्यांनी ज्ञानदानचं काम केलं, असं त्यांनी सांगितलं.
अभिमान वाटावा असा हा आजचा सोहळा आहे. २०१४ ला पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. आज आपण त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवत आहोत. सावित्रीबाई स्वत: एक विद्यापीठ होत्या. त्यांचे एकूण चरित्र वाचले तर त्यांचे काम लक्षात येते. फुले दाम्पत्याने स्वत:च्या सुखी संसारापलिकडे जाऊन समाज सुखाचे स्वप्नं पाहिले, त्यासाठी संघर्ष केला. समोर सगळा अंधार असतांना या दाम्पत्याने सदैव समाज बांधवासाठी, देशातील नागरिकांसाठी कामं केली. लोकांच्या आयुष्यात फुले कशी फुलतील हे पाहिले. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य, असं ते म्हणाले.
प्लेगची लागण झालेल्या पांडुरंग नावाच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंना ही प्लेगची लागण झाली. त्यात त्या गेल्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा विचार केला नाही. अशा सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे, विद्यापीठावर नैतिकतेचे ओझे आहे, असं त्यांनी सांगितलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून विद्यापीठाचा विद्यार्थी कुठेही गेला तरी त्याचा सन्मान व्हावा, विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल असे विद्यार्थी या विद्यापीठात घडावेत, तसा अभ्यासक्रम निश्चित व्हावा अशी अपेक्षा. हे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धात्मक वातावरणात सन्मानाने पुढे गेले पाहिजेत एवढी क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाईंनी महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण केले: फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल संपूर्ण समितीचे आभार. अतिशय चांगल्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी त्यानिमित्त मिळाली आहे. आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे वाटचाल करत आहेत. याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. भारतीय समाज नेहमी त्यांचा आभारी राहील. महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो.
फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा असतो. याचे आद्य उदारहण सावित्रीबाई फुले यांचे आहे. अर्थातच स्त्रीच्या पाठिशी पुरुषही भक्कमपणे उभा राहतो. याचे श्रेय ज्योतिबांना द्यावे लागेल. ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे नेतृत्व केले. ज्योतिरावांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला. त्यामुळे बाबासाहेबांनी फुल्यांना गुरुस्थानी मानले.
फडणवीस म्हणाले की, संस्कारयुक्त शिक्षण आले की न्याय आणि सत्य येते. आजकाल नवीन शिकण्याची इच्छा नसते. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची पाळी आली तर थांबू नये. सावित्रीबाईंनी अपमान, अवहेलना सोसूनही शांतपणे संघर्ष केला. त्यांच्यामुळे अनेकांच्या जीवनात आनंद आला. एका आयुष्यात एका व्यक्तीने किती संघर्ष करावा, समाजाला दिशा देण्याचे किती काम करावे. विधवा मुलांचे संगोपन, पुनर्विवाह, सर्वांपर्यंत शिक्षण, भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा, दलित मुलांची पहिली शाळा, पहिले वाचनालय अशी अनेक कामे फुले दाम्पत्यांनी केली.
फडणवीस म्हणाले की, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे, ही देशाचे पहिली मागणी 1882 मध्ये हंटर कमिशनकडे ज्योतिबांनी केली. त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख केला. त्यांनी अर्धा शतक समाज कार्यासाठी वाहून घेतले. दुष्काळ छावणी, विधवा केशवपन, नाभिक संपात त्या नेत्या होत्या. त्यांनी सक्षम समाज घडवला. सत्यशोधक चळवळीचेही नेतृत्व केले. 1893 मध्ये सासवड सत्यशोधक परिषेचे अद्यक्षपद भूषविले. आपल्या विचारांचा प्रचार साहित्यातून केला. समाज व्यसनाधीन होऊन नये म्हणे शिक्षण घ्या. अंधश्रद्दा पाळू नका. धर्माचे अवडंबर माजवू नका, असे आवाहन केले. रुढीवादी प्रथा संपवण्यासाठी योगदान दिले. खऱ्या अर्थाने समाजउत्थानाचा मार्ग दाखवला. त्यावरून आपण चालत राहू, असे आवाहन त्यांनी केले.
पुतळा कुठे बसावा यावरून होता संभ्रम
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ त्यांचा पुतळा कुठं बसवायचा यावरून समितीमध्ये मतभेद होते . मात्र विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या परिसरातच हा पूर्णआकृती पुतळा बसवण्याचे निश्चित झाले. विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी केली होती. सावित्रीबाई फुले यांचा विद्यापीठात पुतळा बसवत असताना दुसरीकडं शहरातील ज्या भिडेवाड्यात सावित्रबाईनी मुलींची पहिली शाळा घेतली तिथेही शाळा उभारण्यात येणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे महानगर पालिकेच्या वतीनेही शाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक जागेचे संपादनही ही केले जाणार आहे.




