अजित पवार, रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजपच्या गजारियाला अटक
मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरेही मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच आता नव्या वादाला तोंड फुटलंय. विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलच्या जितेन गजारियानं या प्रकरणात वादग्रस्त ट्विट केलंय. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. भाजप नेते जितेन गजारीया यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सहा तासांची चौकशी करुन सोडलं आहे. जितेन गजारीया यांची बीकेसी पोलिसांकडून गेल्या सहा तासांपासून चौकशी सुरु होती. अखेर त्यांना पोलिसांनी चौकशी करुन सोडलं आहे. जितेन गजारीयांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी जितेन यांची पोलिसांकडून सुटका झाल्याची माहिती दिली आहे. जितेन गजारिया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट जितेन गजारिया यानं केलं होतं. भाजप महाराष्ट्र आयटी सेल प्रभारी जितेन गजारिया याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस स्थानकात नेण्यात आलंय. मुंबई सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर या स्टेटमेंट रेकॉर्ड करीत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले होते. रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असं ते म्हणाले होते. त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत; पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्यापैकी माहिती आहे. कारण त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतात. आदित्य ठाकरे कसे काम करतात, उद्धव ठाकरे कसे काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचे नियोजन, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचे बळकटीकरण कसे व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मूल न करता, त्यांना सक्षम कसे करायला पाहिजे यासाठी रश्मी ठाकरे प्रयत्न करत असतात, असेही अब्दुल सत्तार म्हणाले होते.