Top Newsराजकारण

ट्विट अन् कँडल मार्च काढून भाजपचा पराभव अशक्य; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, देशात काँग्रेसशिवायदेखील विरोधीपक्ष शक्य आहे. तसेच, पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्यावी लागेल, असा सल्लाही पीके यांनी काँग्रेसला दिला आहे. याचबरोबर केवळ ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमाने तुम्ही भाजपला हरवू शकत नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी ब्लू प्रिंटदेखील सादर केली. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या पक्षाशिवाय भाजपविरोधी आघाडी उभारणेही शक्य आहे. ते म्हणाले, १९८४ नंतर काँग्रेसला एकातरी लोकसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळाला? गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा ९० टक्के निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी. याच वेळी, मी जवळपास काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच होता, असेही पीके म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना प्रशांत किशोर म्हणाले की, ते सर्वांचे ऐकतात आणि हीच त्यांची ताकद आहे. लोकांना काय हवे आहे? हे त्यांना माहीत आहे. पुढील काही दशके देशाचे राजकारण भाजपभोवतीच फिरत राहणार आहे.

प्रशांत किशोर सध्या ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीची रणनीती तयार करत आहेत. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी, नंतर नितीश कुमार, राहुल गांधी, अखिलेश यादव, एम.के. स्टॅलिन, जगन मोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठीही निवडणूक रणनीती तयार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button