Top Newsराजकारण

भाजपची राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार; रजनी पाटील बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आपला अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली. भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. दुपारी ते उमेदवारी माघारी घेणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर होती. तर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

मित्राने मित्राचा शब्द पाळला

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button