राजकारण

भाजपवाले सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील : ओवेसी

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपकडून इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जात आहे. हे असंच सुरू राहिलं तर ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप आहे आणि जस्टीस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत ज्यांच्या नावाचा समावेश होता, त्या सावरकरांना हे लोक राष्ट्रपिता म्हणून जाहीर करतील, अशी घणाघाती टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात सावरकरांबाबत विधान केलं होतं. हा एका कैद्याचा अधिकार होता. गांधीजींनी सावरकरांना दयेचा अर्ज करण्यास सूचवले होते. ज्या पद्धतीने आपण स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकरही जातील असं गांधीजी म्हणाले होते, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. त्यावरून एकच गदारोळ उठला आहे.

सावरकरांसंबंधी आतापर्यंत खूप खोटे बोललं गेलंय. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे अनेक वेळा अनेकांनी सांगितलंय. परंतु त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सर्वसाधारणपणे कुठल्याही कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. विशेष म्हणजे तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधींनीच सावकरकरांना सांगितलं होतं. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली होती आणि महात्मा गांधींनी सावरकरांना तुरुंगातून मुक्त करण्याचं इंग्रजांना आवाहन केले होते. आम्ही ज्या प्रकारे शांततेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकर लढतील असं गांधींजींनी इंग्रजांना सांगितलं होतं, असंही राजनाथ सिंह पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की, वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या चष्म्यातून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही. वीर सावरकर एक महान नायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज अनेक प्रसंगावरुन आला.ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, पण ते मागे हटले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button