Top Newsराजकारण

भाजप स्वबळावर लढणार : चंद्रकांत पाटील; मनसेसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकीत मनसेशी युती नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार हे स्पष्ट आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळेल. मात्र यात भाजपला नव्या मित्राची गरज भासत असेल तर सर्वांच्या नजरा मनसे-भाजप युतीवर लागल्या होत्या. अनेक दिवस भाजप-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. परंतु आता याला पूर्णविराम मिळाला आहे.

मनसेसोबत युती होणार नाही. हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मागील वेळी मुंबईत आमचा महापौर झाला असता परंतु अमित शाह यांच्या सांगण्यावरुन महापौर पद शिवसेनेला देण्यात आले. मात्र यंदा तसं होणार नाही. मुंबईत भाजपचा महापौर बसेल. आगामी निवडणुकीत भाजप ११७ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक शिवसेनेला जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, काहीही बोलू नका. तुमचं हिंदुत्व काँग्रेसला देखील सांगा. उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका. उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवर आम्ही कधी बोललं नाहीत, सदैव त्यांची तब्बेत ठीक राहावी हीच प्रार्थना केली आहे, मात्र त्यांनी जिथे शेतीचे नुकसान झाले आहे, तिकडे जावे, काल अपघात झाला तिकडे त्यांनी जावे, यावर आम्ही बोललो होतो. आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करून दाखवा, जो प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकण्यात आला आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लगावला.

टिपू सुलतान असं मैदानाला नाव देण्यावरुन जो वाद सुरु आहे. त्यात सरकार दडपशाही करत आहे. हा प्रकार थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन करु असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनाचा मी निषेध करतो, मी धमकी देत नाही. एखद्या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देणं चुकीचं आहे. आम्हाला हे मान्य नाही. भाजपाचा आंदोलनाचा पाठिंबा आहे. भाजपा नगरसेवकाने बोर्ड लावले काय किंवा इतर कुणीही लावले असतील तर ते बोर्ड उखडून काढले पाहिजेत असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईत बैठक

विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झालेल्या ४ तासांच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांची रणनिती निश्चीत करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मनसेसोबत युती करण्यासंदर्भात मुंबईतील नेत्यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. यासंदर्भात मतप्रदर्शन करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मनसेसोबत युती न करण्याचे स्पष्ट मत मांडले. त्यामध्ये, स्वत: लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, खा. मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर यांसह सर्वांनी मनसेसोबत युती नकोच असा सूर व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मनसेसोबत गेल्यास आपण उगाच त्यांची ताकद वाढवू, मनसेसोबत युती ही बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. शिवाय हिंदी भाषिक मतंही भाजपची हक्काची व्होट बँक आहे. उद्या मनसे आपल्यासोबत असेल तर ही व्होट बँक बिचकेल, असे मत नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानंतर, स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसा, असे फडणवीसांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना सांगितले.

महापालिकेतील सत्तारूढ शिवसेनेला सत्तेतून बेदखल करुन महापालिकेत भाजपचे कमळ फुलविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याचे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले. या बैठकीला देवेंद्र फणवीस यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button