राजकारण

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून नागपूरच्या विविध भागात रेकी

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर आता दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. तसंत नागपूर पोलीसही सतर्क झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना ताजी आहे. अशावेळी आता नागपुरात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती मिळत आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नागपूर पोलिसांकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. पोलीस कुठल्याही घटनेला उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, असं अमितेश कुमार म्हणाले. दरम्यान, ज्या ठिकाणांची रेकी केली त्या भागाची माहिती सध्या उघड केली जाणार नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीनं नागपूर पोलीस सज्ज आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावं, असं आवाहन अमितेश कुमार यांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button