पुणे : येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं एकच इंजिन असेल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
फडणवीस यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर २०२४ मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तेजस ठाकरे यांचे स्वागत
यावेळी त्यांना तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असं ते म्हणाले.
चंद्रकांतदादा दिल्लीत दाखल
दरम्यान, चंद्रकांत पाटील आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्याशी अपघाताने नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यामुळे काल आमची भेट झाली. त्यांनी चहासाठी बोलावलं होतं. आता दिल्लीत आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं होतं.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले
वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. मग भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार का ? असा प्रश्न खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. फडणवीस म्हणाले, आमचे दिल्ली दौरे असले तरी कुठलेही संघटनात्मक बदल महाराष्ट्रात होणार नाहीत. नवीन मंत्र्यांच्या भेटीगाठी आणि महाराष्ट्रातले प्रश्न आम्ही दिल्लीत मांडतोय. पण सध्या तरी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कुठेही चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी पक्ष उभा आहे. कृपया पतंगबाजी करु नका, बातम्या कमी पडल्या तर मला एखादी बातमी मागा मी देईन असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार
देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टीमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. २०१६ ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केलाय. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जात आहे. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
शहाण्याने सांगितलं, पुण्यात जास्त बोलू नये
पुण्यातील निर्बंध कमी केले पाहिजेत, व्यापारी आता तोटा सहन करु शकत नाहीत. तुम्ही पुण्यात कमी बोलता असं म्हणतात. पण मला शहाण्या माणसाने सांगितलं आहे, पुण्यात जास्त बोलू नये, अशी टीपणी फडणवीसांनी केली.