Top Newsराजकारण

गोवा निवडणूक : भाजपला मनोहर पर्रिकरांची उणीव नेहमी भासेल – फडणवीस

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार करण्यावर सर्व राजकीय पक्षांचा भर वाढत चालला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांमुळे सर्वच उमेदवार आता घरोघरी जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. यातच गोव्याचे राजकारणही तापताना दिसत आहे. भाजपने गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. गोव्यातील जनता भाजपवर अजिबात नाराज नाही, असा दावा भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मी गोव्यातील राजकारण बदलायला नाही तर, भाजप आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मदत करायला आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना तिकीट देण्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांमध्ये असे उमेदवार आढळून येतील. भाजपने उमेदवारी दिलेल्यांमध्ये बहुतांश जणांवर राजकीय स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आंदोलने, पोलीस स्थानकाला घेराव अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात अशा गोष्टी घडत राहतात.

गोव्याचा इतिहास पाहता ५ वर्षाच्या कालावधीत ७ मुख्यमंत्री झालेले पाहिले आहेत. मात्र, गेल्या १० वर्षांपासून भाजपने गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. गोव्यातील कोणताही समाज भाजपवर नाराज नाही, असे सांगत गोव्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. मात्र, कुणीही त्या आरोपांसंदर्भात पुरावे देऊ शकलेले नाही. यापूर्वी गोव्यात भ्रष्टाचार फोफावला होता. परंतु, भाजप सरकार आल्यापासून चित्र बदलले असल्याचा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची उणीव कायम जाणवेल. मनोहर पर्रिकरांसारखा दुसरा व्यक्ती होणे नाही. पर्रिकरांची कमतरता भरून काढणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत चांगले काम करत आहे. पर्रिकरांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचे काम भाजप आणि प्रमोद सावंत सरकार करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजप, काँग्रेस, तृणमूल कार्यकर्त्यांनीही मते ‘आप’ला द्यावीत : केजरीवाल

भाजप आमदारांना मतदारांनी निवडून दिले, परंतु त्यांनी दहा वर्षांत घोटाळेच केले. सावंत सरकार घोटाळ्यांनी भरलेले आहे, असा आरोप करीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घोटाळेबाजांना दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला सत्तेवर येण्याची एकदा संधी द्यावी असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, सावंत सरकारमध्ये एक मंत्री आहे, ज्याच्याविरुद्ध सेक्स स्कॅण्डलचा आरोप आहे. तसेच दुसऱ्यावर नोकरभरतीचा, तर तिसरा वीज घोटाळ्यात गुंतला आहे, चौथा मजूर घोटाळ्यात आणि पाचवा व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्यात आहे. भाजपने नेहमीच काँग्रेसवाल्यांना पाठीशी घातले. न्यायमूर्ती शहा आयोगाने ३६ हजार कोटींचा खाण घोटाळा उघडकीस आणला. परंतु भाजपने गेल्या दहा वर्षांच्या काळात खाण घोटाळ्यात गुंतलेल्या एकाही काँग्रेसी नेत्याविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. आप भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यास कटिबद्ध आहे.

केजरीवाल म्हणाले की, नोकऱ्यांमध्येही वशिलेबाजी तसेच लाचखोरी चालू आहे. छोट्या व्यावसायिकांकडून परवान्यांसाठी लाच घेतली जात आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघांमध्येच नोकऱ्यांची खिरापत वाटली जाते, हे गौडबंगाल आहे. आप सत्तेवर आल्यास नोकरभरती पारदर्शक असेल.’

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आपने ज्या गोष्टी करून दाखवल्या, त्या भाजपला शक्यच नाहीत. मोफत वीज देणे शक्य नसल्याचे भाजपने कबूल केले आहे. दिल्लीत आम्ही चांगल्या शाळा, मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज दिली. गोव्यातही या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. काँग्रेसकडे कोणताही अजेंडा नाही. मगोप किंवा गोवा फॉरवर्ड सरकार स्थापन करू शकणार नाही, हे त्यांच्या मतदारांनी ओळखावे. कोणालाही पक्ष सोडून आमच्याकडे या असे आम्ही म्हणत नाही. परंतु मतदारांनी या सर्व गोष्टींचा विचार करून ‘आप’ला एकदा संधी द्यावी.

गोव्यात ‘डबल’ नाही तर ‘ट्रबल’ इंजिन सरकार; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा भाजपला टोला

तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या हितासाठी लढत आहे की भाजपला मदत करण्यासाठी यावर त्यांनी पुन्हा विचार करावा. तृणमूल काँग्रेसने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली. गोव्यातील भाजप सरकारवर टीका करताना सुरजेवाला यांनी गोव्यात डबल इंजिन नाही तर ट्रबल इंजिन सरकार आहे असे विधान केले.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आम आदमी पक्ष आणि भाजपवर निशाणा साधला. सुरजेवाल म्हणाले की, गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कोरोना भ्रष्टाचार उघड केला होता तेव्हा त्यांची बदली करण्यात आली. खाण व्यवसाय सुरू करणार अशी आश्वासने वारंवार भाजपने दिली आहेत. अद्याप खाण व्यवसाय सुरू झालेला नाही. भाजप सरकार गोव्याला कोळसा हब करू पाहतोय.

या सरकारने मच्छिमार इंडस्ट्री, लहान उद्योग, जैवविविधता, पारंपरिक व्यवसाय हे सर्व नष्ट केले आहे. राज्यात सर्व घटकातील लोकांना वारंवार आंदोलने करावी लागली. टॅक्सी, अंगणवाडी, खाण व्यवसायावर अवलंबित यांना आंदोलन करणे भाग पाडले. गेल्या पाच वर्षात सरकारने लोकांवर केवळ अन्याय केला आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. केजरीवाल सरकारने अकरा हजार कोटी फक्त जाहिरातीवर खर्च केले आहेत. हे पैसे कुठून येतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता अलका लांबा तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button