Top Newsराजकारण

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ‘पोस्टर गर्ल’चा भाजपमध्ये प्रवेश

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जारी केल्यानंतर पक्षातील सदस्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. रामपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने पक्ष सोडून समाजवादी पक्षाचे सदस्यत्व पत्करले. तर प्रियंका गांधींनी ४० टक्के महिलांना तिकिट देण्यासाठी राज्यात सुरु केलेल्या मोहिमेचा चेहरा प्रियंका मौर्यने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी प्रियंका मौर्य भाजपच्या कार्यालयात गेली होती. त्यानंतर ती भाजपत प्रवेश करतेय, अशी जोरदार चर्चा सुरु होती.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील ४० टक्के महिला उमेदवारांना तिकिट देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यात ‘मै लडकी हूं, लड सकती हूं’ अशी मोहीमही सुरु करण्यात आली. या मोहिमेच्या पोस्टर्सवरील काँग्रेस कार्यकर्ती प्रियंका मौर्य ही असून या चळवळीसोबत ती जोडली गेली होती. मागील काही दिवसांपासून प्रियंका मौर्य चर्चेत आली होती. प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संसदीप सिंह यांच्यावर तिने तिकिट विकल्याचा आरोप केला होता. प्रियंका मौर्य हिला लखनौमधील सरोजनी नगर येथून तिकिट हवे होते. मात्र पक्षाने तिला या जागेसाठीचे तिकिट दिले नाही. त्यामुळे ती प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराज होती.

काँग्रेसची मोहीम फसवी- प्रियंका मौर्य

भाजपच्या कार्यालयात गेलेल्या प्रियंका मौर्य हिने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, मी माझ्या विभानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र पक्षाने तेथून मला तिकिट दिले नाही. काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण इथे आमच्या हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही मोहीमच फसवी आहे, असा आरोप प्रियंका मौर्य हिने केला आहे. प्रियंका मौर्यने भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. तिच्यासोबत समाजवादी पक्षाचे माजी आम. प्रमोद गुप्ता यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button