तामिळनाडूत भाजपच्या श्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ!
स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप
चेन्नई: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत भाजप (BJP) आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ ओढावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत तामिळनाडूतील काँग्रेस आणि द्रमुक पक्षातील घराणेशाहीवर टीका केली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या व्हीडिओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून श्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लीप वापरल्याचे समोर आले.ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी भाजपला ट्रोल केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून हा व्हीडिओ तात्काळ डिलीट केला.
भाजपने श्रीनिधी चिदंबरम यांची डान्स क्लीप असलेला व्हीडिओ शेअर केल्यानंतर पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. यानंतर काँग्रेसने एक ट्विट करत भाजपला टोला हाणला. एखाद्याची संमती घेणे, ही संकल्पना समजणं तुमच्यासाठी किती अवघड आहे, हे आम्ही समजू शकतो. मात्र, तुम्ही श्रीनिधी चिदंबरम यांचा फोटो आणि क्लीप त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय वापरायला नको होती. तुम्ही जो काही उपद्व्याप केलाय त्यावरुन तुमचा सर्व प्रचार खोटा आणि प्रोपोगंडावर आधारित असल्याचे सिद्ध झाले, असे काँग्रेसने म्हटले आहे.
श्रीनिधी चिदंबरम यांनी 2010 साली जागतिक तामिळ परिषदेच्यावेळी हे नृत्य सादर केले होते. सेमोझी गाण्यावर त्यांनी हे सादरीकरण केले होते. मात्र, भाजपने हा व्हीडिओ कोणाचा आहे, याची खातरजमा न करता तो बिनधास्त आपल्या निवडणूक प्रचारासाठी वापरला.