मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला? त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचे स्पष्ट दिसत असून नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच, परंतु भाजपकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवले आहे. पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते तसेच अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा. आम्ही कालच या संदर्भात अमित शाह यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व गृहमंत्रालय हे गप्पच आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ जे लोक गेले होते ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, याचे व्हीडिओ प्रसार माध्यमांनी दाखवले आहेत. यात नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. एका केंद्रीय मंत्र्यांने पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचे केलेले विधान हास्यास्पद आहे. वय झाल्यानंतर लोकांची नजर कमी होते परंतु यांचे वय वाढल्यानंतर नजर वाढल्याचे दिसते, असा टोला नारायण राणे यांचे नाव न घेता पटोले यांनी लगावला.
भाजपविरोधात बोलणारच
पंतप्रधानपदाची गरीमा घालवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे त्याविरोधात आम्ही बोलणारच. माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असे प्रत्युत्तर पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले.
यासंदर्भात पटोले म्हणाले की, मी काल आणि आजही बोललो, पंतप्रधानपदाची गरीमा आहे. जे पंजाबमध्ये घडले त्याचा आम्ही निषेधच करतो पण जो कार्यक्रम आधी पाठवला होता तो शेवटच्या क्षणी का बदलला हा पश्न आहे. केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि रस्ता ऐनवेळी बदलणे हेच चुकीचे आहे. मग हा कार्यक्रम बदलणारे कोण आहेत? केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याला जबाबदार आहेत. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहोचले? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे पटोले म्हणाले.
पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे आवाहन
महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा हात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या देशातील पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित घटनेबाबत संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले आहे. पण नाना पटोलेंच्या वक्तव्यात मात्र कोणतेही गांभीर्य नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. नाना पटोले हे बेलगामपणे वक्तव्य करत आहेत. देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर बोलण्याइतके हे बेलगाम झाले आहेत का ? पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांना काही अधिकार आहे की नाही ? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. नाना पटोले यांच्या बेलगाम वक्तव्याविरोधात राज्यातील कार्यकर्त्यांना गावोगावी तक्रार करण्याचे मी आदेश देत असल्याचेही पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी नाना पटोलेंना उत्तर देताना म्हटले की नौटंकी तुमची चाललेली आहे. तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देता. त्यानंतर सत्तेतील इतर कोणत्याही पक्षाला माहिती नसते. त्यानंतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता आणि मंत्रीपदासाठी धावाधाव करता. पण मंत्रीपद न मिळाल्यानेच जळफळाट करता. त्यामुळे खरी नौटंकी नाना पटोले करत आहेत. राणे साहेब म्हणाले की नितेश कुठे आहे हे सांगितल्यावर तुम्ही, नोटीसा काढता. मी असतो तर थोबाडीत मारले असती असे फक्त म्हटल्यासाठी तुम्ही अटक करता. मग नाना पटालोंच्या बेताल आणि बेलगाम वक्तव्याविरोधात गावोगाव केसेस दाखल करण्याचे आवाहन करतो आहे. मी सगळ्या जिल्हाध्यक्षांना याबाबतचे आदेश केबिनमधून देईन असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. देशाच्या गृहमंत्र्यांवर, पंतप्रधानांवर बोलता. पंतप्रधानांना नौटंकी म्हणता, एवढे हे बेलगाम झाले आहेत का ?
पटोले यांचे नारायण राणेंवर टीकास्त्र
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पंजाबमधील घटनेचा निषेध केलाय. पण बोलता बोलता त्यांनी मोदींच्या गाडीवर कथित दगडफेक झाल्याचा उल्लेख केलाय. त्यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पलटवार केलाय.
”पंतप्रधान काल पंजाबच्या दौऱ्यावर होते, ते विकासाच्या कार्यक्रमाला जात होते. ४२ हजार कोटींच्या योजनांचं उद्घाटन करायला जात होते. भूमिपूजनही करायला जात होते. त्यावेळी ते हेलिकॉप्टरने जाणार होते, वातावरण खराब झाल्यानं बायरोड गेले. रस्त्यावर त्यांना थांबवण्यात आलं. समोरून जी दगडफेक आणि हल्ला झाला त्या घटनेचा मी निषेध करतो, अशा घाणेरड्या घटना, षडयंत्र काँग्रेसच करू शकते”, असंही नारायण राणे म्हणालेत. त्यालाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय.
काही नेते सांगतात की तिथे दगडफेक झाली. मला असं वाटतं माणसांचं वय झालं की त्याला कमी दिसतं. पण काही लोकांना वय जास्त झाल्यानंतर जास्त दिसत असेल तर मला माहिती नाही. ही घटना घडवून घेतली गेलेली आहे. हे ठरवून केलं गेलेलं आहे, असं म्हणत पटोलेंनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलंय.
दिल्लीत राजघाटावर भाजप खासदारांचे मौन
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत राज्य सरकारने निष्काळजपणा केल्याचा आरोप करून भाजप नेते काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. राजधानी दिल्लीत आज राजघाट येथे भाजपा खासदारांनी मौन धरणे आंदोलन केले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भातील चुकीमुळे पंजाब सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, ‘काँग्रेस को सद्बुद्धी दे भगवान’ अशा आशयाचे फलक झळकावत काँग्रेसने मौन आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत छेडछाड नही सहेगा हिंदुस्थान, पंतप्रधानांवरील हल्ल्याचा कट रचण्यास जबाबदार असलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे स्लोगन यावेळी भाजप खासदारांकडून झळकवण्यात आले होते.