भाजपला हादरा; बीडमध्ये प्रीतम मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.
‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीडमध्ये भाजपमध्ये राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.