भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी-ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
नवी दिल्ली : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या दिल्लीत चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. बुधवारी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बुधवारी दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील साऊथ एव्हेन्यू या ठिकाणी भेट घेतली.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी टीएमसीमध्ये सामील होण्याबाबत प्रतिक्रिया दिली. मी तर यापूर्वीपासून त्यात आहे. मी तर पूर्णवेळ त्यांच्या सोबतच.. असं म्हणत यानंतर त्यांनी यावर बोलणं टाळलं. सुब्रह्मण्यम स्वामी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भेटीनंतर स्वामी यांनी ट्विटरवरून ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं. मी जितक्याही राजकारण्यांची भेट घेतली, ज्यांच्यासोबत काम केलं, त्यापैकी ममता बॅनर्जी या जेपी, मोररजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्यासारख्या आहेत. यांच्या बोलण्यात आणि काम करण्यात फरक नव्हता. भारतीय राजकारणात हाच एक दुर्मिळ स्वभाव आहे, असं ते म्हणाले.
भाजपवर साधला होता निशाणा
काही काळापूर्वी ममता बॅनर्जी यांचा रोम दौरा रद्द होण्यावरून स्वामी यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच त्यांना रोमला जाण्यापासून का थांबवण्यात आलं असाही सवाल केला होता. विविध मुद्द्यांवर अनेकदा स्वामी यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला होता. आर्थिक मुद्द्यांवरुनही त्यांनी प्रश्न विचारले होते.