शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष स्वार्थ साधतोय; भाजपची टीका
मुझफ्फरनगर: कृषी कायद्यांसाठी केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन हे राजकीय होत चालले आहे. शेतकरी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये भाजपाविरोधात प्रचार करतील. मात्र, येत्या काळात हरियाणामध्ये कोणत्याच निवडणुका नसल्याने ते तिथे भाजपाविरोधात प्रचार करणार नाहीत, अशी टीका भाजप खासदार संजीव बाल्यान यांनी केली आहे. मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या किसान महापंचायतीवरून बाल्यान यांनी शेतकरी आंदोलनावर निशाणा साधला आहे.
गेल्या ८ महिन्यांपासून वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि मोदी सरकार दोन्ही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यातच आता भाजपने शेतकरी आंदोलनावर टीकास्त्र सोडले असून, विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप केला आहे.
येत्या काळात शेतकऱ्यांच्या इतर रॅली, मेळावे आणि कार्यक्रम असो, या सर्वांना समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल साधने पुरवत आहेत, असा आरोप करत विरोधी पक्ष त्यांचा वापर करत असून, याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करावा, असेही बाल्यान यांनी म्हटले आहे. तसेच आमची इच्छा आहे की शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा बैठक सुरू व्हावी. मात्र, या बैठकीत शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या आणि अडचणींबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. एवढ्या दीर्घकालीन आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी खाली हाताने परतायला नको. सरकारने केलेले कायदे रद्द करण्याच्या हट्टाऐवजी कोणते कायदे शेतकऱ्यांसाठी करायला हवेत, याबद्दल त्यांनी चर्चा करावी, असे बाल्यान म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये झालेली किसान महापंचायत एक राजकीय मेळावा होता, असा दावा करत भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत हे देशाच्या शत्रुंच्या हातातील शस्त्र बनले आहेत. शेतकरी नेत्यांना केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल पाकिस्तान सरकारकडून त्यांचे कौतुक करायचे आहे का, याबद्दल विचार करावा, असे बाल्यान यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका भाजप पुन्हा जिंकत सरकार स्थापन करेल. राज्यात फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत आणि मार्चमध्ये आम्ही सरकार स्थापन करू. जे आमचा विरोध करताहेत त्यांनाही आम्ही मते मागू, अगदी ज्यांनी महापंचायत केली त्यांच्याजवळही मत मागण्यासाठी आम्ही जाऊ. २०१२ ते २०१७ या दरम्यानचा काळ हे राज्य अजूनही विसरले नाही, असे बाल्यान यांनी नमूद केले.