सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले भाजपचे आ. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू आहे आज गुरुवारी याबाबत अंतिम निकाल येणे अपेक्षित होता त्याप्रमाणे अंतिम निकाल आला असून न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत दणका दिला आहे. मात्र, असं असलं तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता परिसरात करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पोलिसांकडून आ. नितेश राणे यांच्या अटकेची तयारी केली होती. तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती. मात्र नितेश राणे यांनी पोलीस कारवाईपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू होती, मात्र यावर निर्णय झाला नव्हता. आज यावर अंतिम निकाल देण्याचे न्यायालयाने बुधवारी सांगितले होते. त्याप्रमाणे सकाळपासूनच काय निकाल न्यायालय देईल याची उत्सुकता शिगेला ताणली होती त्याप्रमाणे संध्याकाळी उशीरा त्याबाबतचा निर्णय आला असून यात आमदार नितेश राणे यांना दणका दिला असून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
काय म्हणाले राणेंचे वकील?
नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई म्हणाले की, आमच्यापुढे हायकोर्टात जाणे हा पर्याय आहे. यावर योग्य ती चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ. मात्र, शक्यतो उद्या हायकोर्टात केस दाखल करू. ती बोर्डावर यायला वेळ लागेल. दोन-तीन दिवस तरी लागतील. नितेश राणे यांनी आतापर्यंत पोलिसांना सहकार्य केले आहे आणि इथून पुढेही आम्ही पोलिसांना सहकार्य करू, असे देसाई म्हणाले.
संग्राम देसाई पुढे म्हणाले की, कोर्टाने नितेश राणे यांचा मोबाइल जप्त करून कस्टडी मागितली आहे. मात्र, आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. तिथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत. तिथे सुनावणी होईपर्यंत आम्हाला बाजूला राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नितेश राणे काही शरण वगैरे येणार नाहीत. मात्र, पोलिसांना तपासात आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि मदत मागितली तरी ती करू, असे ते म्हणाले.
कणकवलीत पोलिसांचा फौजफाटा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले होते. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करावी याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आक्रमक झाले आहेत.
नितेश राणे यांचा शोध सुरू
कणकवली पोलिसांकडूनही नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना काल नोटीस बजावली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली. तर राणे यांनी आपण सध्या व्यस्त असून, सध्या चौकशीसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळवले आहे.