
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा धमाका करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पण या नेत्यांची कोणत्या संदर्भात पोलखोल करणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. पण संजय राऊत यांच्या गर्भित इशाऱ्यानंतर भाजपच्या तंबूत चांगलीच खळबळ उडालेली दिसत आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेला अवघे दोन तास बाकी असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आम्हाला अटक करून दाखवा असं जाहीर आव्हान देणारे हे दोन्ही नेते अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
संजय राऊत हे दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधूनही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेना भवना समोर दाखल झाले आहेत. बर्दाश्त बहोत किया अब बर्बाद करेंगे असं राऊतांनी सुनावलं होतं. त्यामुळे राऊत यांच्या पीसीपूर्वीच भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत काय बोलणार मला माहीत नाही. त्यांच्या मनातील मला ओळखता येत नाही, असं म्हटलं होतं. तेच पाटील आज दुपारी २ वाजून २ मिनिटांनी अचानक दिल्लीला रवाना झाले. तर मला अटक करून दाखवा, मी बसलेलोच आहे. माझी बॅग भरलेलीच आहे. मी कुणाला घाबरत नाही, असं पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगणारे किरीट सोमय्याही सायंकाळी ५ वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेते अचानक दिल्लीत गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
दिल्ली भेटीत चंद्रकांत पाटील आणि सोमय्या हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राऊत यांनी राज्यातील किंवा केंद्रातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यास पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन हे दोन्ही नेते दिल्लीतील नेत्यांकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाटील आणि सोमय्या यांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.