Top Newsराजकारण

गुन्हेगारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निधी वाटपावरून भाजप नेत्यांचा ठाकरे सरकारवर हल्लबोल

मुंबई : राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्र राज्य आज गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी सादर करत फडणवीसांनी राज्याचं गृहखातं झोपा काढत असल्याचा आरोप केला. गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असलं तरी दोषसिद्ध करण्याचं प्रमाण देखील कमी असल्याचा मुद्द्यावर फडणवीसांना यावेळी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात दोषसिद्ध होण्याचं प्रमाण बिहारपेक्षाही कमी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

ठाकरे सरकारवर चौफेर हल्लाबोल करत असताना फडणवीसांनी आपल्या भाषणात निधी वाटपावरही भाष्य केलं. यात ठाकरे सरकारमध्ये अजित पवार सर्वात फायद्यात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस आपलं म्हणणं मांडत असताना त्यांनी निधी वाटपावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावताना राष्ट्रवादीला कसा सर्वाधिक निधी मिळाला याची आकडेवारी मांडली. सरकारमध्ये अजितदादा तुम्ही सर्वात फायद्यात आहात असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण जो निधी वाटप झाला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखत्यारितील खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला. हा आकडा २ लाख ५० हजार ३८८ कोटी इतका आहे. काँग्रेसवाले पण हुशार निघाले. रोज तक्रार करुन करुन त्यांनी १ लाख १ हाजर ७६६ कोटी रुपये निधी प्राप्त केला. पण शिवसेनेवाले हातवर करुन फसले. सर्वात जास्त आमदार असूनही केवळ ५४ हजार ३४३ कोटी निधी मिळाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमरावती, नांदेडमध्ये दंगलीचा ‘प्रयोग’

अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा यावेळी फडणवीसांनी केला. एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. यात जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकांना लक्ष्य केलं गेले. हिंदुच्याच दुकानांची तोडफोड केली गेली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यादिवशी अमरावतीत संबंधित प्रकार घडला त्यादिवशीच्या घटनेबाबत कुणी बोलायला मागत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम उमटले त्यावरच सगळे बोलू लागले आणि त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दंगलीत आपली मोटारसायकल जाळली जाईल अशी भीती होती म्हणून तरुण आपली मोटारसायकल घरात नेत होता. तर त्याला पकडून पोलिसांनी अटक केली, असे प्रकार अमरावतीत घडले आहेत असंही फडणवीस म्हणाले. रझा अकादमीचे लोक रातोरात राज्यात दंगलीचे प्रयोग करतायत मग यावर सरकार काय कारवाई करणार? रझा अकदमीबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे की नाही?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात बदल्यांचे रॅकेट

आज राज्यात पोलीस दलाची अवस्था जर सुधारली नाही तर देशात सर्वोत्तम मानलं जाणारं महाराष्ट्राचं पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही. माझ्याकडे बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती समोर आली. मी माझ्याकडची माहिती गृहसचिवांना दिली तर काय चुकीचं केलं? उलट मी खूप जबाबदारीनं वागलो. मी ती माहिती माध्यमांना दिली नाही. पण सरकारमधील काहीच लोकांनी माध्यमांकडे माहिती दिली याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. पोलीस जर दोन-तीन कोटी देऊन आज जर पदावर येत असतील ते वसुलीच करणार नाहीत का?, असं फडणवीस म्हणाले.

कुंभकर्णही म्हणेल ‘गृहखातं रिश्ते में मेरा बाप है’; मुनगंटीवारांचा खोचक टोला

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राज्याचं गृहखातं झोपा काढण्यात कुंभकरणालाही मागे टाकेल असा कारभार करत असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. देशात महिलांविरोधातील गुन्हेगारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो याची आकडेवारीच मुनगंटीवार यांनी सभागृहात सादर केली.

गुन्हेगारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो हा मुद्दा देखील आपण सोडून देऊ. पण दोषसिद्ध करण्याचं प्रमाण बिहारमध्ये देखील ५० टक्क्यांहून अधिक आहे. पण महाराष्ट्रात हेच प्रमाण १५ टक्के इतकं आहे. यातून राज्याचं गृहखातं किती झोपा काढतं हे लक्षात येतं. तो कुंभकर्ण देखील या सरकारला म्हणेल महाराष्ट्राचं गृहखातं ‘रिश्ते में तो मेरा भी बाप निकला’, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेवारी वाढत आहे. आपण शक्ती कायदा आणत आहात. पण अंमलबजावणीचं काय? लोकसंख्या जास्त आहे म्हणून गुंडांची संख्या जास्त आहे. गुन्हेगारी जास्त आहे हे असंही आपण समजून घेऊ शकतो. पण दोषसिद्ध करण्याच्या घटत्या प्रमाणाचं काय? हे अतिशय दुर्दैवी आहे. दोषिसिद्ध करण्याच्या वेगात बिहार देखील महाराष्ट्राच्या पुढे आहे याचा विचार गृहखातं करणार आहे का?, असं मुनगंटीवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button