भाजपमध्ये धुसफूस; संघटनमंत्री विजय पुराणिक कार्यमुक्त
मुंबई : पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रिपदावरुन विजय पुराणिक यांना हटवण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश नेतृत्व आणि विजय पुराणिक यांच्यात काही कारणामुळे कटुता निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांगितले जात आहे. संघटनमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार सध्या श्रीकांत भारतीय यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेश नेतृत्व आणि विजय पुराणिक यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून कटुता निर्माण झाली होती. तसेच पक्षातील संघटनात्मक नियुक्त्या, पक्षातर्फे राबविण्यात येणारे कार्यक्रम यासंदर्भात प्रदेश नेतृत्व आणि पुराणिक यांच्यात काही धुसफूस सुरु होती. कदाचित याच कारणामुळे पुराणिक यांना पायउतार व्हावे लागल्याचा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र, यावर बोलताना पक्षातील एका नेत्याने “पुराणिक यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे,” सांगितले.
भाजपमध्ये संघटनमंत्री या पदाला अतिशय महत्त्व आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत संघटनमंत्री महत्त्वाच्या भूमिका पार पडतात. परंपरेनुसार या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेऊन त्याची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केली जाते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रवींद्र भुसारी यांच्याकडे संघटनमंत्रिपद होते. मात्र, त्यांना अचानक पदावरुन हटवण्यात आले होते. यावेळी भुसारी यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा असल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नेतृत्व असताना विजय पुराणिक यांच्याकडे संघटनमंत्रिपदाचा पदभार होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. त्यामुळे पुरणिक यांना कार्यमुक्त करण्यात आले.
विजय पुराणिक यांना संघटनमंत्रिपदावरुन कार्यमुक्त करण्यात आहे. पुराणिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक तसेच प्रांत प्रचारक म्हणूही काम पाहिलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते एक खंदे कार्यकर्ते मानले जातात. दरम्यान, सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे श्रीकांत भारतीय यांच्याकडे प्रदेश संघटनमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या पदासाठी लवकर नवी नेमणूक जाहीर करण्यात येईल. असे सांगण्यात येतेय. विजय पुराणिक हे सध्या विपश्यनेसाठी गेल्याची माहिती आहे.