Top Newsराजकारण

स्वत:ला सांभाळा, नाहीतर राणे स्टाईलनेच नॉनव्हेज थाळी मिळेल; खा, नारायण राणेंचा राऊतांना इशारा

मुंबई: शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असं सांगतानाच स्वत:ला सांभाळा. तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधला. परवा झालेल्या हल्ल्यातील हात आणि पाय विसरणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, त्यांना सोडणार नाही. शिवथाळी कोण कुणाला देतयं हे पाहूच, असं सांगतानाच प्रसादाची परतफेड कशी करायची एवढं आम्ही शिकलो आहे. शिवसेनेतच शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे स्वत:ला सांभाळा, नाहीतर विनाकारण तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे तुम्हाला समजणारही नाही, असं राणे म्हणाले.

जो कुणाला थप्पड मारू शकला नाही तो उघड उघड धमक्या देतोय. मी इथेच थांबतो. बघू कोण कुणाला शिवथाळी देतोय. त्यांना राणे स्टाईलनेच भाजपकडून थाळी मिळेल. त्यात राणे असतील, असं सांगतानाच राणे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. महिलांवर ज्यांनी हात उचलले त्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ. या लोकांना शिवथाळी दिल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राऊतांना फटकारले. शिवसेना भवनचा इतिहास राऊतांना काय माहीत आहे काय? त्यावेळी शिवसेनेत तरी होतात का? तेव्हा तुम्ही ‘लोकप्रभात’ काम करत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते छापू का ‘प्रहार’मध्ये इशाराही त्यांनी दिला. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली आणि वर्गणीही जमवून दिली. तेव्हा शिवसेना भवन उभं राहिलं. तुमचं योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आला. तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं? कुणाच्या कानफडात मारली का कधी?, असं सांगतानाच इतर पक्षांची जशी कार्यालये असतात तेवढंच महत्त्व शिवसेना भवनचं आहे, असं ते म्हणाले.

वैभव नाईक पळून गेला

वैभव नाईकने काही हल्ला केला नाही. तुमच्याकडे फुटेज असेल तर पाहा. उलट तो पळून गेला. तो कसला हल्ला करतोय, असंही ते म्हणाले. आजची शिवसेना राहिली नाही. आजची शिवसेना बाळासाहेबांचीही नाही आणि जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button