मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती व नेमणूकपत्र देणे बाकी होते त्यांना ते देण्यातही कोरोनाचा अडसर नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल. कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे, ती लोक सहन करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
भाजप राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेऊन सहभागी होऊ. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजप पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोविडचे मोठे सावट आहे. त्यामुळे उत्सव न करता कोविडशी संबंधित सेवेचे काम करायचे निर्णय भाजपाने घेतला आहे. त्या दिवशी देशात एक लाख तर महाराष्ट्रात २० हजार गावात जाऊन पक्षातर्फे सेवाकार्य करण्यात येईल. पक्षातर्फे देशभरात ५० हजार बाटल्या रक्तदान करण्यात येणार आहे, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
माथेरान येथील उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण व रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते. माथेरान नगरपरिषदेत आता भाजपचे बहुमत झाले आहे.