
मुंबई: हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडी विरोधात अविश्वास ठराव आणावाच. म्हणजे भाजपसोबत नेमकं कोण आहे ते तरी कळेल, असा खोचक टोला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अविश्वास ठरावाबाबतचं भाष्य केलं होतं. त्यावरून नवाब मलिक यांनी हा टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा. विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे. विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते. मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना हे विधान केलं होतं. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हान त्यांनी अशोक चव्हाणांना दिलं होतं. ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. असं असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली होती.
चंद्रकांत पाटील आज म्हणाले की, विधानसभेत अनेक प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांनाच डील करावी लागते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस सतत सावध असायचे. विदेशात गेल्यावरही ते चार जणांना कामे नेमून द्यायचे. एल्फिस्टनचा ब्रिज पडला तेव्हा ते विदेशात होते, मुंबईत आल्यावर ते डायरेक्ट घटनास्थळी गेले. तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा यासाठी कोणी निमंत्रण देत नाही, तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर पार पाडायला पाहिजे, असही ते म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरही भाष्य केले. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी. उद्धवजींच्या तब्येतीबाबत विरोधकांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.




