नाशकात चंद्रकांत पाटील यांचा भेटीचा ‘राज’योग!
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या दौऱ्यासाठी एकाच शासकीय विश्रामगृहावर उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अखेर आज भेट झाली. योग असेल तर राज यांची भेट घेऊ, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा अखेरीस सकाळीच ‘राज योग’ जुळून आला.
राज्यात महाआघाडी सरकार असल्यामुळे राज ठाकरे आक्रमक होत आहेत त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप बरोबर त्यांची युती होईल, अशी चर्चा आहे. विशेषत: येऊ घातलेल्या मुंबई आणि नाशिक, पुणे महापालिकेत, अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही उतरणार म्हटल्यानंतर नाशिकमध्येच युतीची पायाभरणी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व राज्याला हवे आहे, असे सांगताना त्यांचे कौतुक केले होते. मात्र, त्याचबरोबर ते परप्रांतीयांचा मुद्दा सोडत नाही, तोपर्यंत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. योग असेल तर राज यांची भेट होईल, असे सांगणार्या पाटील यांनी आज सकाळी विश्रामगृहावर राज ठाकरे यांची भेट घेतली. अर्थात, त्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.