राजकारण

राणेंचे बाण वर्मी लागलेले दिसताहेत; भातखळकर यांचा टोला

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठकरेंबाबत केलेले आक्षेपार्ह विधान चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असून, नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. दरम्यान. नारायण राणेंविरोधात निघालेल्या अटकेच्या आदेशावर आता भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी या कारवाईवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसत आहेत. मोगलाई सरकार भाजपा नेत्यांची मुस्कटदाबी करून जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.

पुण्यातही गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे युवा चिटणीस रोहित कदम (रा. पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी व्हीटी न्यूज चॅनेल पहात असताना त्यात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन दोन गटात तेढ निर्माण होऊन दंगा होणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या गैरहेतूने चिथावणी देणारे वक्तव्य केलेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने त्यांचे चाहते, समूह व त्यांचे पक्षातील गट हा आक्रमक होऊन त्यातून काही तरी अनुचित प्रकार घडावा, जेणेकरुन महाराष्ट्रातील परिस्थिती अस्थिर करुन त्याचा गैरफायदा घेण्याचे गैरहेतूने जाणिवपूर्वक परिणामांची कल्पना असताना हे वक्तव्य करण्यासाठी नारायण राणे यांनी जाणिवपूर्वक व हेतूपुरस्कर पत्रकार परिषद घेतली आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button