राज्यातील ‘सुपर सीएम’च्या पद्धतीची भाजपला चिंता : आशिष शेलार
मुंबई: एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. पण त्या नगर विकास खात्यात सुनियोजितपणा नाही. पर्यावरण मंत्री सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेताना आम्हाला दिसतंय. सध्या सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे, असं सांगतनाच एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं सांगून भाजपचे आ. आशिष शेलार यांनी आणखी गोंधळ उडवून दिला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं सांगून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमाका उडवून दिला आहे. राणेंच्या या विधानावर चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनीही मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं, असं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावेळी त्यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. या कॅबिनेटमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यांना रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही. मिळेत तेव्हा लाथा मारण्याचं काम राष्ट्रवादीने सुरू ठेवलं आहे. त्यांचा समन्वयाशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचा विचका करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
राणेंचे सुसंस्कृत राजकारण
नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर भेटीवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या कार्यकर्त्यांनी लढा दिला आहे. त्या विभागात आमचे कार्यकर्ते पाय रोवून होते. त्यांच्या भावनांचा आम्ही सन्मान करतो. पण राजकारणाच्या पलिकडे जाऊनही काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहता कामा नये. राणेंनी जे केलं तो सुसंस्कृत राजकारणाचा भाग होता, असं ते म्हणाले.