नक्षलवाद्यांना मोठा दणका; पोलीस चकमकीत भास्कर, सुखदेव नैताम, सुजाता गावडेसह ५ जण ठार

गडचिरोली : गडचिरोलीत आज चकमकीत ठार झालेल्या पाचही मृत माओवाद्यांची ओळख पटली असून चकमकीत 50 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी भास्करचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भास्करवर 41 खुनांसह पोलिसांवर हल्ल्याचे 78, जाळपोळीचे 16 इतर 19 असे 115 गुन्हे दाखल केले आहेत.
भास्कर हा 2019 च्या कुरखेडा भुसुरुंग स्फोटात 15 जवानाच्या हत्येचा कटात मुख्य भूमिकेत होता. सध्या भास्कर माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि माओवाद्याच्या दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य आहे. भास्करचा मृत्यू माओवादी चळवळीसाठी मोठा हादरा आहे. मृतकामध्ये टिपागड दलमचा उपकमांडर सुखदेव नैतामचाही समावेश असून त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीस आहे. तर प्लाटून पंधराची सदस्य असलेल्या सुजाता गावडे याचाही मृतकामध्ये समावेश असून तिच्यावरही पंधरा लाखांचे बक्षीस आहे. या माओवाद्यांचे मृतदेह हॅलीकॉप्टरमधून गडचिरोलीत आणण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली जात आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्याच्याजवळील वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपू्र्वी महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील (Maharashtra-Chhattisgarh border) गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroli Police) सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) नष्ट केलं आहे.