Top Newsइतर

तौत्के चक्रीवादळाने प्रचंड नुकसान; त्वरित पंचनामे करुन नुकसानभरपाईची मागणी

मुंबई: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई-ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलंय.

वादळाची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेलं वारं आपण पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसंच १६० मिमी, १२० मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होतोय. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल

तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास ८० टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसलळे आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.

नांगरलेली बोट वाहून गेली

देवडच्या समुद्र किनाऱ्यावर नांगरुन ठेवलेली एक बोट वाहून गेल्याची घटना घडलीय. या बोटीत ७ जण होते. वादळामुळे आलेल्या लाटेत ही बोट समुद्रात वाहून गेली. बोटीतील तिघे पोहून किनाऱ्यावर परत आले. मात्र, एकाचा मृतदेह आढळून आला आहे. तर अन्य तीन जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात एका ठिकाणी भिंत कोसळून १० मोटरसायकलचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.

उरणमध्ये २ महिलांचा मृत्यू

उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नुकसान भरपाईची मागणी

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी खान यांनी केली आहे.

आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त

गेल्या दोन दिवसांपासून तौत्के चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या आंबा व केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तौत्के वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करुन लवकर नुकसान भरपाई देऊन लोकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, पुणे जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शिनोलीमधील भगवान बोऱ्हाडे या शेतकऱ्याचं आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, ७० झाडांची आंब्याची बाग पूर्ण गळाली, तर खेड तालुक्यातील भिवगाव इथं अंगणवाडीवरचे पत्रे उडाले, तौक्ते चक्रीवादळाचा घाटमाथ्याला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या २४ तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळेल

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, पंतप्रधानांकडून वादळाचा आढावा

तौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटका

तौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. बारामती परिमंडलात ५४७ विजेचे खांब कोसळले, तर १८७७३ रोहित्र बंद पडल्याने ८६९ गावांतील काही काळ वीजपुरवठा विस्कळीत, वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच ४४ उपकेंद्र व ३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

टेम्पोवर जाहिरात फलक कोसळला, दोघे गंभीर

कल्याण-शीळ रोडवर धक्कादायक प्रकार, रस्त्याच्या कडेला असणारा भलामोठा जाहिरात फलक एका टेम्पोवर पडला, गाडीतील २ जण गंभीर जखमी, कटर मशिनने टेम्पोचा पत्रा कापून दोघांना काढले बाहेर, गंभीर असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू, डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडगे यांची माहिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button