
मुंबई : गेला दीड महिना उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. काही कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी काही कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केल्याचीही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतरही कामगार कामावर राहिले नाहीत. त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अनिल परब अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. निलंबित केलेल्या १० हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहेत. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीसीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना ८ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.
२० तारखेला कोर्टात सुनावणीची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल. मात्र आत्ता उगाच एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे. दिशाभूल करून संप भरकटत आहे. विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणार आहे, अशी प्रतिक्रिया एसटीच्या संपावर आणि विलीनीकरणावर अनिल परब यांनी दिली आहे. तोपर्यंत कामावर या असे आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा केले आहे.