मुंबई : राज्यात क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर चांगलच वादंग उठलं असून हा वाद आता राजकीय झाला आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे, समीर वानखेडे यांच्यासह कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आज समीर यांच्या पत्नी क्रांती, वडील ज्ञानदेव आणि बहिणी यास्मीन यांनी राज्यपालांची भेट घेतली.
नवाब मलिक यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपामुळे आणि खासगी आयुष्यातील बाबी सोशल मीडियातून सार्वजनिक करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात वानखेडे कुटुंबीयांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी, धीर धरा, सत्याचा विजय होईल, असे आश्वासन राज्यपांनी दिल्याचे क्रांती रेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ज्या लोकांना असं वाटत असेल की हे गरीब बिचारे काय करणार. पण, आम्ही योद्धा आहोत, आम्ही सत्याचे योद्धा आहोत. आम्ही आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो आहोत, त्यांच्याकडून आम्हाला स्फूर्ती मिळाली आहे. तसेच, सध्या चे चालू आहे, आमच्या कुटुंबीयांना टाँट केलं जातंय. कुटुंबीयांच्या इज्जतीवर शाब्दीक हल्ला केला जातोय, या सगळ्या गोष्टी आम्ही राज्यपालांसमोर ठेवल्या आहेत. थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होईल, असे कोश्यारी यांनी आश्वासन दिल्याचे क्रांती रेडकर यांनी सांगितले.