मुक्तपीठ

बंडातात्या कराडकरांची मळमळ नियोजनबद्ध

- विजय चोरमारे

महाराष्ट्र सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात साता-यात आंदोलन करताना बंडातात्या कराडकर जी वक्तव्ये केली, ती त्यांच्या सडलेल्या मानसिकतेची निदर्शक आहेत. वारकरी संप्रदायाचा टिळा लावून विशिष्ट राजकीय विचारधारेचा प्रचार-प्रसार तसेच, विद्वेषाची पेरणी करण्याचे काम ते सातत्याने करीत आले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत, हे त्यांच्या आजवरच्या वाटचालीतून स्पष्ट झाले आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. परंतु ते करताना त्यांच्या मनातली जी मळमळ बाहेर आली आहे, ती त्यांच्या मूळ विचारधारेची निदर्शक आहे. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांना त्यांनी टार्गेट केले आहे, ते अनवधानाने नव्हे, तर त्यामागेही एक सूत्र आहे. बघा मी दोन्ही पक्षातल्या स्त्रियांची नावे घेतली आहेत म्हणजे मी राजकीय पक्षपाती नाही, हे दाखवण्याचा एक प्रयत्न. दुसरे म्हणजे सार्वजनिक जीवनातील बहुजन स्त्रियांना, बहुजन नेत्यांना टार्गेट करून त्यांचे चारित्र्यहनन करायचे. बंडातात्यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या एकूण मानसिकतेवर आणि प्रवृत्तीवरही प्रकाश टाकणारे आहे. त्यांनी नंतर कितीही खुलासे केले आणि माफी मागितली तरी समाजमाध्यमांवर त्यांचे हे व्हिडिओ कायमस्वरुपी राहणार आहेत, आणि भविष्यात कधीही संबंधित नेत्यांच्या बदनामीसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. बंडातात्यांनी माफी मागितली म्हणून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून काढून टाकला जाणार नाही हे बंडातात्यांना आणि ते ज्या परिवाराचे प्रतिनिधित्व करतात त्यांनाही माहीत आहे. म्हणूनच बंडातात्यांच्या या वक्तव्याची `जीभ घसरली` म्हणून बोळवण करता येणार नाही. त्यापाठीमागचे नियोजनबद्ध षड्.यंत्र लक्षात घेण्याची गरज आहे. आणि कायदेशीर मार्गाने त्यांचा बंदोबस्तही करण्याची गरज आहे. एरव्ही देवेंद्र फडणवीसांसारखी मंडळी बंडातात्यांची पाठराखण करीत असतात, त्यांच्या ताज्या वक्तव्यासंदर्भातील त्यांची भूमिकाही समोर येण्याची गरज आहे.

गेली दोन दशके वारकरी संप्रदायाचा मूळ प्रवाह प्रदूषित करण्यासाठी बंडातात्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न चालवले आहेत. मूळ वारकरी संप्रदायातील धुरिणांच्या निष्क्रियतेमुळे बंडातात्या आपल्या मोहिमेत चांगल्या रितीने यशस्वी होत असल्याचे दिसून येते. वृत्तवाहिन्यांचा उथळपणा आणि तिथे वाह्यातपणाला मिळत असलेली प्रसिद्धी यामुळे बंडातात्यासारख्यांचे फावते आहे. बंडातात्या, तुषार भोसले किंवा राजकीय क्षेत्रातल्या आणखी काही उपटसुंभांना ज्या रितीने टीव्हीच्या पडद्यावर फुटेज मिळते, ते त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधातील वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते, ते पाहिल्यानंतर माध्यमांची मानसिकताही स्पष्ट होते. या मंडळींनी काहीही बरळायचे आणि टीव्हीवाल्यांनी त्यांना वारेमाप प्रसिद्धी द्यायची. एका अर्थाने ही एक उघड युतीच आहे. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये ज्या रितीने `गोदी मीडिया` प्रस्थापित झाला आहे, त्याचीच ही प्रादेशिक पातळीवरील भ्रष्ट आवृत्ती आहे.

बंडातात्या म्हणजे वारकरी संप्रदाय असे चित्र निर्माण करून त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला, कृतीला प्रसिद्धी दिली जाते. परंतु त्यांच्यामागच्या शक्ती कोण आहेत, त्यांचा हेतू काय आहे आणि त्यांचे वास्तव काय आहे हे दाखवण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. पंढरपूरच्या वारीला वारेमाप प्रसिद्धी दिली जाते, परंतु या वारीत हिंदुत्ववादी शक्ती कशा घुसल्या आहेत आणि वारीचा निर्मळ प्रवाह त्यांनी कसा प्रदूषित केला आहे, हे दाखवण्याचा कुणी प्रयत्न केला नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला विरोध करून मुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी तुकोबांच्या पालखीने मूळ स्वरुपातील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला पाठिंबा दिला होता, हे कुणीच समोर आणले नव्हते. तुकोबांच्या पालखीतील साडेतीनशे दिंड्यांनी तसे ठराव केले होते. वारकरी संतांचे तत्त्वज्ञान हाच या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा गाभा असल्याची भूमिका तुकोबाच्या पालखीशी संबंधित मांडली होती, परंतु बंडातात्या आणि तत्सम मंडळींच्या प्रभावाखाली असलेल्या वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेतली नव्हती हे विसरून चालणार नाही. हे विधेयक लांबत गेले आणि त्याचीच परिणती डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये झाली. तेव्हा या हत्येला जबाबदार असलेले घटक कोण आहेत याचा नीट विचार करण्याची गरज आहे.

गावोगावचे वारकरी जे वारीत सहभागी होतात, ते भोळेभाबडे, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वाट तुडवीत असतात. विठ्ठलावर श्रद्धा असली तरी बाकी कुठल्याही देवाचे त्यांना वावडे नसते. उलट सगळ्या देवळांतल्या सगळ्या देवांची ते पूजा करीत असतात. याचाच गैरफायदा घेऊन विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संघटनांनी त्यांच्याच श्री राम रुजवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या प्रकरणानंतर त्याला जोर आला. विश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर हे या मंडळींचे पुढारी आहेत. विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाचे पुढारपणे करणा-या बंडातात्यांनी पंधरा वर्षांपूर्वी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे थेट विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले होते. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वेळोवेळी सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. त्याअर्थाने अण्णा हजारे आणि बंडातात्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अण्णा हजारेंची झोपमोड करून त्यांना पुन्हा जागे करण्याचा प्रसारमाध्यमांतील काही घटक जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. ते जागे होत नाहीत, तोपर्यंत बंडातात्यांसारखी मंडळी आहेतच. बंडातात्यांनी त्यांना नेमून दिलेला राजकीय कार्यक्रम सुरू ठेवावा, परंतु गळ्यातील तुळशीमाळेचे भान ठेवून किमान सार्वजनिक सभ्यता पाळावी, एवढीच अपेक्षा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button