मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर अनेक राजकीय नेते पायधूळ झाडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, संभाजीराजेंनी गेल्या आठवड्याभरात नेते शरद पवार यांची भेट घेतली. आता महाविकास आघाडीतील दुरावे पाहता आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांची भेट घेतली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती. यावर वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जर दुसऱ्यांच्या अखत्यारीतील, खात्यांचे निर्णय मीडियासमोर जाहीर करत असतील, तर मी काय चुकीचे केले, अशी नाराजी व्यक्त केली होती. यावरून तिन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.
या साऱ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या निवासस्थानी जात काँग्रेस नेते थोरात यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये काय बोलणे झाले, याची माहिती देण्यात आली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले गेले.
तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन वर्ष लोटलं तरी महामंडळ प्राधिकरण आणि समित्यांचं वाटप प्रलंबित आहे. त्यामुळे आता येत्या पंधरा दिवसांत महामंडळांचं वाटप होईल, तसेच त्यासंदर्भातील चित्रही स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. तिनही पक्षांमध्ये महामंडळांचं समसमान वाटप होत असल्यानं त्यातही चुरस दिसून येत आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच या भेटीनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.