राजकारण

भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नका : उद्धव ठाकरे

भाजप नेत्यांकडून वारंवार महाराष्ट्राची बदनामी; जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपकडून सातत्याने होत असलेल्या बेछूट आरोपामुळे सरकारची आणि महाराष्ट्राचीही अब्रू चव्हाट्यावर येत असताना भाजपच्या या षड्यंत्राला कोणत्याही परिस्थितीत बळी पडू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना केल्या. सुमारे पावणेतीन तास ही बैठक चालली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेले वाहन पार्क केल्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे तात्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडील आयुक्तपद काढून घेत त्यांची गृहरक्षक दलात बदली करताच परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये वसूल करून देण्याचे आदेश दिले होते, असे परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटले होते. परमबीर सिंह यांच्या या लेटरबॉम्बनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून आहे. या मागणीसाठी भाजपने आंदोलन करण्याची घोषणा करत आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

भाजपच्या या कृतीने आघाडी सरकार बॅकफूटवर आले असून सरकारने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. मात्र, दुसरीकडे परमबीर सिंह यांच्या या आरोपाचा बोलावता धनी भाजपच असून आरोप होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेताच चक्र फिरल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांची महत्वपूर्ण बैठक वर्षावर बोलावण्यात आली होती. या बैठकीत भाजपकडून सातत्याने होणार्‍या आरोपांमुळे सरकारची अब्रू चव्हाट्यावर येत असल्याचे सांगत नेत्यांनी चिंता व्यक्त केली. प्रामुख्याने पालघरचे साधू हत्याकांड, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण, कंगना राणावत वरील कारवाई, रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी याच्यावरील कारवाई, समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांचे चारित्र्यहनन, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा या प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपात तथ्य नसताना सरकारची आणि त्याअनुषंगाने महाराष्ट्राची बदनामी झाल्याचे उपस्थित नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ऐकवले.

आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पद्धतशीर आरोप करत आणखी एक षड्यंत्र रचले जात आहे. भाजपच्या या षड्यंत्राला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे, असा बैठकीत सूर निघाला. तेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्धाराने सामोरे जावू असे स्पष्ट केले. हवे तर या आरोपाची चौकशी व्हावी, तीही राज्यातल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून व्हावी. त्यात काही निष्पन्न झाले तरच कारवाई व्हावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button