Top Newsराजकारण

गोवा निवडणूक : बाबूश यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न; दीपक पाऊसकर यांचा गौप्यस्फोट

पणजी : बाबूश मोन्सेरात व गोवा फॉरवर्ड २०१९ साली सावंत सरकार पाडण्यासाठी कट- कारस्थाने करीत होते, असा गौप्यस्फोट माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी केला आहे. आज सरकार मुख्यमंत्री सावंत नव्हे, तर बाबूश मोन्सेरात हेच चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

पाऊसकर म्हणाले की, सरकार पाडण्याची कारस्थाने करूनही भाजप बाबूशला डोक्यावर घेत आहे. पक्षाने माझे तिकीट कापले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. त्यावेळी सरकार पाडण्याची कारस्थाने शिजत असल्याचे मला कळल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजपत घेतले आणि सरकार बळकट केले. बाबूश, गोवा फॉरवर्डचे नेते मॅच बघण्यासाठी म्हणून विदेशात गेले होते; परंतु बाबूश विदेशातून सावंत सरकार पाडण्यासाठी कट कारस्थाने करीत होते.

सरकारात मंत्री असूनही भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पाऊसकर यांचा पत्ता कापला. सावर्डेत पक्षाने माजी आमदार गणेश गांवकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाऊसकर यांनी मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच सासरे विरुद्ध सून निवडणुकीच्या रिंगणात?

सत्तरीच्या राजकारणात आज वेगळा रंग आला असून ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे यांनी सकाळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचारास सुरुवात केली. पर्येत आता जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे किंवा त्यांच्या पत्नी विजयादेवी हे आपल्या सुनेविरुद्ध निवडणुकीत उतरणार आहेत. काही दिवस तळ्यातमळ्यात भूमिका घेतलेल्या प्रतापसिंग राणेंची भूमिका यामुळे स्पष्ट झाली आहे.

सोमवारी सकाळी त्यांनी पर्ये येथील श्री भूमिका मंदिर, तसेच केरी श्री आजोबा मंदिर व पर्येतील श्री म्हाळसा देवी मंदिरात जात देवतांचे दर्शन घेतले. प्रतापसिंग राणे यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्येत भाजपतर्फे दिव्या राणे यांना भाजपाचा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राणे कुटुंबासमोर प्रश्न उपस्थित झाला असून राणे यांनी उमेदवारी दाखल केली तर मात्र सत्तरीच्या इतिहासात प्रथमच सासरे व सून अशी लढत पाहावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापसिंग राणे व विश्वजित राणे यांच्यात शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली होती. त्यामुळे त्या कुटुंबातील अंतर्गत कलह दिसून आला होता. प्रतापसिंग राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे सुद्धा प्रचार शुभारंभ करण्यास उपस्थित होत्या. त्यामुळे राणे यांच्या निवडणुकीत उतरणार असल्याच्या निर्णयास त्यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येते. कदाचित विजयादेवी राणे सुद्धा उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्ये मतदारसंघात ज्येष्ठ राणे यांच्या निर्णयाने लक्ष वेधून घेतले असून प्रतापसिंग राणे यांनी सुनेच्या विरोधातच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पर्येत सध्या आपचे विश्वजित कृष्णराव राणे, तुणमूल काँग्रेस पक्षाचे गणपत गांवकर तर शिवसेनेचे गुरुदास गांवकर रिंगणात आहेत. त्यामुळे पर्येत बरीच रंगत होण्याची चिन्हे आहेत.

गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार

गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होताच ‘गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क’या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी दिली. राज्यात तृणमूलचे सरकार स्थापन होताच सर्व तिन्ही योजनांची अंमलबजावणी होईल, असं ते यावेळी म्हणाले. तृणमूल प्रवेशानंतर गोव्यात प्रथमच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सिन्हा केवळ या योजनांच्या व्यवहार्यतेबद्दलच बोलले नाहीत तर निधीच्या स्रोताबाबतही स्पष्ट केले आणि करदात्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याचे तसेच या योजना राबविण्यासाठी राज्याला आणखी कर्ज घ्यावे लागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिन्हा म्हणाले, ‘या योजनांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि त्यांची अंमलबजावणी होईल, याची खात्री करून घेण्यासाठी तृणमूल सरकार सत्तेत आल्यानंतर मला तीन ते सहा महिने गोव्यात बसावे लागले तरी चालेल.

अर्थमंत्री म्हणून आपला अनुभव मांडताना सिन्हा यांनी या तीन योजनांसाठी निधी कसा उभारला जाईल, हे विषद करून सांगितले. ते म्हणाले, या तीन योजना मिळून सुमारे ३,३३० कोटी रुपये खर्च होतील. वित्त आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषांच्या संदर्भात गोव्याकडे आधीच २,१०० कोटी रुपयांची अतिरिक्त वित्तीय तरतूद आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या बजेटमधून ही रक्कम या कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल.

आम्ही सध्याच्या अर्थसंकल्पातून या योजनांसाठी पैसे काढू. त्यासाठी करदात्यांवर कोणतेही अतिरिक्त कर लावले जाणार नाहीत किंवा आम्ही या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही अतिरिक्त कर्ज घेणार नाही. स्वतःचे घर कोणाला नको असते? तरुणांना २० लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. जेणेकरून ते स्टार्ट-अप किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतील. महिलांना गृहलक्ष्मीच्या माध्यमातून पैसे हातात येतील, असंही त्यांनी नमूद केलं.

शाश्वत शेती आणि शाश्वत खाण व्यवसायावरही पक्ष लक्ष केंद्रीत करेल. जे दोन्ही गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे ते म्हणाले. ‘डबल इंजिन’ या शब्दावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले, आज मोदी राज्य सरकारसंदर्भात दुहेरी इंजिनबद्दल बोलत आहेत, उद्या ते पंचायतींच्या संदर्भात तिहेरी इंजिनबद्दल बोलतील. हे कसे चालेल?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button